मृत्यूच्या दाखल्यासाठी कुटुंबाचे नगरपरिषदेत महिनाभरापासून हेलपाटे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:15 IST2021-07-02T04:15:01+5:302021-07-02T04:15:01+5:30
जामखेड : खासगी रुग्णालयात कोरोनाबाबतचे उपचार घेत असताना मृत्यू झालेल्या व्यक्तीचा मृत्यू दाखला मिळविण्यासाठी एक कुटुंब महिनाभरापासून नगरपरिषदेत हेलपाटे ...

मृत्यूच्या दाखल्यासाठी कुटुंबाचे नगरपरिषदेत महिनाभरापासून हेलपाटे
जामखेड : खासगी रुग्णालयात कोरोनाबाबतचे उपचार घेत असताना मृत्यू झालेल्या व्यक्तीचा मृत्यू दाखला मिळविण्यासाठी एक कुटुंब महिनाभरापासून नगरपरिषदेत हेलपाटे मारत आहे. त्या व्यक्तीचा खासगी रुग्णालयात मृत्यू झाला होता. खासगी रुग्णालय व नगरपरिषद यांच्या गाेंधळात त्या कुटुंबाची परवड होत आहे. लवकरात लवकर दाखला न मिळाल्यास तालुक्यातील नायगाव येथील कुटुंबाने उपोषणाचा इशारा दिला आहे.
याबाबत नायगाव येथील प्रदीप हनुमान यादव यांनी नगरपरिषद मुख्याधिकारी मिनीनाथ दंडवते यांना एक पत्र दिले आहे. त्यात म्हटले की, वडील हनुमान विठ्ठल यादव यांना २२ एप्रिल रोजी कोरोनाचे निदान झाले. जामखेड येथील एका हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी त्यांना दाखल केले. उपचारादरम्यान त्यांचा ३ मे रोजी मृत्यू झाला. मृत्यूनंतर रुग्णालयाचे संपूर्ण बिल भरले. त्यानंतर हाॅस्पिटलने मृतदेह नगरपरिषदेच्या ताब्यात दिला. नगरपरिषद कर्मचाऱ्यांनी त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले. त्यानंतर २४ मे रोजी नगरपरिषदेत वडिलांच्या मृत्यू दाखल्याची मागणी केली. त्यांनी आमच्याकडे अद्याप मृत्यूची नोंद झाली नाही, असे सांगितले. तुम्हीच मृत्यू झालेल्या दवाखान्यातून मृत्यू दाखला घेऊन या, असे सांगितले. त्यानंतर तक्रारदार प्रदीप यादव यांनी त्या हॉस्पिटलकडे मृत्यू दाखल्याची मागणी केली. त्यांनीही मृत्यू दाखला देण्यास नकार दिला. त्यानंतर याबाबत नगरपरिषदेच्या संबंधित विभागात वारंवार सांगूनही दखल घेतली गेली नाही, असे यादव यांनी तक्रारीत म्हटले आहे. वडिलांच्या मृत्यूनंतर शेतजमिनीची वारस नोंद, पीक कर्जाचे नूतनीकरण यासाठी मृत्यूचा दाखला गरजेचा आहे. मात्र, याकडे नगरपरिषद दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे आम्ही उपोषण करणार आहोत, असे त्यांनी पत्रात म्हटले आहे.
----
नायगावच्या तक्रारदाराचा अर्ज मिळाला असून याबाबत संबंधित खासगी हॉस्पिटलचा मृत्यू अहवाल (नमुना ४) जमा करण्याबाबत नोटीस बजाविली आहे. त्यांच्याकडून अहवाल आल्यानंतर नोंद करण्यात येईल.
-मिनीनाथ दंडवते,
मुख्याधिकारी, नगरपरिषद