विरोधी पक्षनेत्यांचे अपयश

By Admin | Updated: July 7, 2014 00:36 IST2014-07-06T23:48:17+5:302014-07-07T00:36:54+5:30

अहमदनगर : काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांनीच सिंचन घोटाळा उघडकीस आणला. मात्र हा घोटाळा विरोधी पक्षनेत्यांनी उघडकीस आणायला हवा होता.

Failure of Opposition Leaders | विरोधी पक्षनेत्यांचे अपयश

विरोधी पक्षनेत्यांचे अपयश

अहमदनगर : काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांनीच सिंचन घोटाळा उघडकीस आणला. मात्र हा घोटाळा विरोधी पक्षनेत्यांनी उघडकीस आणायला हवा होता. त्यामध्ये ते कमी पडले, असे सांगून नाव न घेता विरोधी पक्ष नेते एकनाथ खडसे यांच्यावर शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी अप्रत्यक्ष हल्ला केला.
जिल्ह्यामध्ये सारोळा बद्दी आणि नगर येथे भगवा सप्ताह आणि कार्यकर्त्यांच्या मेळाव्यासाठी आले असता शासकीय विश्रामगृहावर कदम यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी संपर्कप्रमुख सुहास सामंत, आमदार अनिल राठोड, शहरप्रमुख संभाजी कदम, ज्येष्ठ कार्यकर्ते श्रीराम येंडे उपस्थित होते.
राज्यातील सिंचन योजनांवर ७५ हजार कोटी रुपये खर्च केले तरी राज्यामध्ये सिंचनाचा पत्ता नाही. आघाडी सरकारने अनेक घोटाळ््यांची चौकशी केली, भ्रष्टाचार मान्य केला, मात्र कोणावरही कारवाई झाली नाही. राज्यातील शेतकऱ्यांना संपविण्याचे खरे पाप काँग्रेस-राष्ट्रवादीनेच केले आहे, अशी टीकाही कदम यांनी
केली. ते म्हणाले, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार घर तिथे शिवसेना अभियान राबविण्यात येत आहे. गरीब-शेतकरी यांना न्याय देण्यासाठी राज्यात बदल हवा आहे.
लोकसभेप्रमाणेच विधानसभेतही मनसे हात दाखवून अवलक्षण करून घेतील. दोन्ही काँग्रेसकडून सुपारी घेऊन त्यांनी (राज ठाकरे ) मराठी माणूस लोकसभेत जाऊ द्यायचा नाही, यासाठी शिवसेनेच्या विरोधात उमेद्वार उभे केले. (प्रतिनिधी)
युती अभेद्य
शिवसेना-भाजपा युती अभेद्य आहे. कार्यकर्त्यांना भावना असतात, त्या ते व्यक्त करतात. बाळासाहेब ठाकरे, प्रमोद महाजन अशा नेत्यांनी ही युती तयार केली आहे, ती तुटणे अशक्य आहे. लोकसभेला भाजपाला जास्त जागा आणि विधानसभेला शिवसेनेला जास्त जागा हे युतीचे सूत्र आहे. महाराष्ट्रात शिवसेना मोठा भाऊ, तर भाजपा लहान भाऊ आहे. लोकसभेत उलटे आहे. शिवसेनेने कधी पंतप्रधानपदावर दावा केला का? असे सांगून रामदास कदम यांनी महायुतीची सत्ता आल्यानंतर मुख्यमंत्री हा शिवसेनेचाच राहील, हे स्पष्ट केले.
सत्ता आल्यास मी गृहमंत्री....
गेल्या ६७ वर्षांत काँग्रेस पाण्याचे समान वाटप करू शकली नाही. आघाडी सरकारने अनेक घोटाळे, भ्रष्टाचार केला. तो त्यांनी मान्य केला. चौकशी झाली. तरी कारवाई होत नाही. त्यामुळे युतीची सत्ता आल्यानंतर गृहमंत्रीपद माझ्याकडे घेणार आहे. भ्रष्ट मंत्र्यांच्या कुंडल्या तयार करण्याचे काम सुरू आहे. काँग्रेसच्या नेत्यांना दुष्काळ हवा असतो, तो पैसे खाण्यासाठीच. पाणी टंचाई हे त्यांच्याच सरकारचे पाप आहे, असे रामदास कदम म्हणाले.

Web Title: Failure of Opposition Leaders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.