शासकीय कर्मचाऱ्यांच्या विमा कवच योजनेस मुदतवाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:21 IST2021-05-18T04:21:14+5:302021-05-18T04:21:14+5:30
कोविड-१९ संबंधित कर्तव्य बजावताना मृत्यू होणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांना प्रत्येकी ५० लाख रुपये सानुग्रह साहाय्य लागू करण्याचे आदेश दि. २९ ...

शासकीय कर्मचाऱ्यांच्या विमा कवच योजनेस मुदतवाढ
कोविड-१९ संबंधित कर्तव्य बजावताना मृत्यू होणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांना प्रत्येकी ५० लाख रुपये सानुग्रह साहाय्य लागू करण्याचे आदेश दि. २९ मे २०२० रोजी जारी झाले होते. शासन निर्णयानुसार सदर आदेश ३० सप्टेंबर २०२० पर्यंत लागू होते व नंतर त्यास ३१ डिसेंबर २०२०पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. त्यानंतर घडलेल्या मृत्यूची प्रकरणे वित्त विभागाच्या सहमतीने विशेष बाब म्हणून निकाली काढली जात होती. मात्र राज्यात मार्च २०२१ पासून कोरोनाची दुसरी लाट वेगाने पसरली. या पार्श्वभूमीवर विमा कवच योजनेस मुदतवाढ देण्याची मागणी महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनने शासनाकडे केली होती. सातत्याने पाठपुरावा केल्याने आता राज्य सरकारने या योजनेस ३० जून २०२१ पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतचा शासन आदेश नुकताच जारी झाला आहे. ग्रामसेवक युनियनचे राज्य अध्यक्ष एकनाथ ढाकणे, राज्य सरचिटणीस प्रशांत जामोदे यांनी या निर्णयाचे स्वागत केले असून, कोविडमुळे दुर्दैवी मृत्यू झालेल्या ग्रामसेवकांच्या वारसांना या विमा कवचाचा लाभ मिळवून देण्यासाठी पाठपुरावा केला जात असल्याचे सांगितले. हे विमा कवच संरक्षण १ जानेवारी २०२१ ते ३० जून २०२१ या कालावधीसाठी लागू असेल. कोविडमुळे मयत झालेल्या ग्रामसेवकांची विमा कवच योजनेची प्रलंबित प्रकरणे तातडीने निकाली निघावी यासाठीही युनियन वरिष्ठ पातळीवर प्रयत्न करत असल्याचे ढाकणे यांनी सांगितले.