शिर्डीत भर लोकवस्तीत गॅस टाकीचा स्फोट; जिवीत हानी टळली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 27, 2021 17:44 IST2021-01-27T17:43:37+5:302021-01-27T17:44:34+5:30
शिर्डी येथील श्रीरामनगर भागातील अत्यंत वर्दळीच्या लोकवस्तीजवळ पाच पैकी एका चायनीय हॉटेलमध्ये गॅस टाकीचा स्फोट झाला. यावेळी पत्राच्या छताचे व या ठिकाणच्या साहित्याचे मोठे नुकसान झाले.

शिर्डीत भर लोकवस्तीत गॅस टाकीचा स्फोट; जिवीत हानी टळली
शिर्डी : येथील श्रीरामनगर भागातील अत्यंत वर्दळीच्या लोकवस्तीजवळ पाच पैकी एका चायनीय हॉटेलमध्ये गॅस टाकीचा स्फोट झाला. यावेळी पत्राच्या छताचे व या ठिकाणच्या साहित्याचे मोठे नुकसान झाले. आगीवर वेळीच नियंत्रण मिळवतानाच पाच पैकी चार गॅस टाक्या सुरक्षित काढण्यात यश आले. यामुळे मोठी जीवीत हानी टळली.
२६ जानेवारी रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास घडली. येथील श्रीरामनगर भागात कोते गल्लीजवळ कोलकाता येथील गौर मंडल व चुलता सुखदेव मंडल हे चायनिजचा कच्चा माल तयार करतात. २६ जानीवारी रोजी कच्चा दुपारी ३ वाजेच्या सुमारास कच्चा माल तयार करण्याचे काम चालू होते. गौर मंडल या दरम्यान लघुशंकेसाठी गेला. त्याचवेळी गॅस शेगडी व सिलेंडरने पेट घेतला. क्षणात आगीने रौद्र रुप धारण केले. गॅस सिलेंडरचा मोठा स्फोट झाला. स्फोट झालेल्या गॅस टाकीच्या ठिक-या ठिक-या झाल्या.
गॅस टाकीच्या स्फोटाचा आवाज घेऊन जवळ राहणा-या परिसरातील नागरिकांसह नगरसेवक जगन्नाथ गोंदकर, सामाजिक कार्यकर्ते पोपटराव शिंदे, लुकेश शिंदे यांनी धाव घेतली. तातडीने अग्नीशामक दलाची संपर्क साधला. लुकेश शिंदे यांनी उर्वरित चार गँस टाक्या काढण्यासाठी प्रयत्न केले. काही क्षणात शिर्डी नगरपंचायतीचा अग्नीशामक बंब घटनास्थळी दाखल झाला. अग्नीशामक दलाचे विलास लासुरे व त्यांच्या सहकार्याने आगीवर नियंत्रण मिळविले. शिर्डी पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक दिपक गंधाले यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. आगीचे कारण समजू शकले नाही.