संगमनेर (जि. अहमदनगर) : मराठी तमाशाविश्वातील वगसम्राज्ञी अशी ओळख असलेल्या कांताबाई सातारकर यांच्या निधनामुळे लोककला क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. तमाशाच्या गौरवशाली परंपरेतील संघर्षाबरोबरच सुवर्णकाळ अनुभवलेल्या कांताबाईंच्या जाण्याने कलाक्षेत्रावर शोककळा पसरली आहे.गुजरातमधील बडोदा जिल्ह्यातील टिंबा या गावात १९३९ मध्ये कांताबाई यांचा जन्म झाला. त्यांना तमाशाचा कोणताही वारसा नव्हता. पुढे त्यांचे आई-वडील सातारा या मूळगावी आले. तेथे कांताबाई यांना ‘नवझंकार मेळ्यात’ नृत्याची संधी मिळाली आणि त्यांचा कलाप्रवास सुरू झाला. मुंबईत तमाशामहर्षी तुकाराम खेडकर यांच्या तमाशात काम करताना त्यांच्यातील कलाकार घडत गेला. खेडकर आणि कांताबाई या जोडीला अमाप लोकप्रियता मिळाली. पुढे खऱ्या आयुष्यातही ही जोडी एक झाली. पती खेडकर यांच्या निधनानंतर कांताबाईंनी स्वतःचा फड उभा केला.
पुरुषी भूमिकाही हुबेहूब वठविल्यामराठी रंगभूमीवर पुरुषांनी स्त्रियांच्या भूमिका केल्याची अनेक उदाहरणे आहेत. मात्र, स्त्रीने पुरुषी भूमिका केल्याची उदाहरणे क्वचितच पाहायला मिळतील. कांताबाईंनी वगनाट्यांतून छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांच्या भूमिका इतक्या हुबेहूब वठवल्या की, पुरुष कलाकारांनाही त्या भूमिकांची नक्कल करावी वाटायचे, असा त्यांचा लौकिक होता.कांताबाई सातारकर यांची गाजलेली काही वगनाट्ये व त्यातील भूमिका‘रायगडची राणी अर्थात पन्हाळगडचा नजरकैदी’ (सोयराबाई), ‘डोम्या नागअर्थात सख्खा भाऊ बहिणीचा पक्का वैरी’ (बायजा), ‘असे पुढारी आमचे वैरी’ (आवडा), ‘कलंकिता मी धन्य झाले’ (अनाथ आश्रमातील मुलगी), ‘पाच तोफांची सलामी’ (गजरा), ‘कोर्टादारी फुटला चुडा’ (सगुणा), ‘महारथी कर्ण’ (कुंती), ‘हरिश्चंद्र-तारामती’ (तारामती), ‘जय-विजय’ (नायकीन), ‘अधुरे माझे स्वप्न राहिले’ (नर्तकी), ‘गवळ्याची रंभा’ (रंभा), ‘गोविंदा-गोपाळ्या’ (राणी), ‘विशालगडची राणी’ (राणी), ‘बेरडाची औलाद’ (सुगुणा), ‘१८५७ सालचा दरोडा’ (सुशीला), ‘चित्तोडगडचा रणसंग्राम’ (राणाप्रताप), ‘तडा गेलेला घडा’ (अलका), ‘कोंढाण्यावर स्वारी’ (जिजाबाई).