गणेशोत्सवामुळे बाजारपेठेत उत्साह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:27 IST2021-09-09T04:27:07+5:302021-09-09T04:27:07+5:30
अहमदनगर : गणेशोत्सवामुळे बाजारपेठेत उत्साह संचारला आहे. गणेशाच्या आगमनासाठी सजावट साहित्य खरेदीसाठी बाजारात गर्दी झाली आहे. विद्युत रोषणाई, घरगुती ...

गणेशोत्सवामुळे बाजारपेठेत उत्साह
अहमदनगर : गणेशोत्सवामुळे बाजारपेठेत उत्साह संचारला आहे. गणेशाच्या आगमनासाठी सजावट साहित्य खरेदीसाठी बाजारात गर्दी झाली आहे. विद्युत रोषणाई, घरगुती आरास करण्यासाठीच्या साहित्याने बाजारपेठ फुलली आहे. याशिवाय गणेश चतुर्थीचे मुहूर्त साधून इलेक्ट्राॉनिक साहित्य, मोबाईल, वाॅशिंग मशिन, फ्रीज आदी साहित्यालाही मागणी वाढली आहे. गणेश स्थापनेचे मुहूर्त साधून खरेदीसाठी ग्राहकांनी पसंती दिली आहे.
कोरोनाचे निर्बंध असले तरी, घरगुती गणेशोत्सवाला यंदा चांगला उत्साह दिसून येत आहे. यंदा कोरोनाचे निर्बंध गतवर्षीपेक्षा बऱ्यापैकी शिथिल केलेले आहेत. शिवाय दिवसभर दुकाने उघडी ठेवण्यासाठी परवानगी दिलेली असल्याने बाजारात उत्साह आहे. शुक्रवारी (दि. १०) बाप्पांचे आगमन होणार आहे. बाप्पांच्या आगमनासाठी मूर्ती बाजारात गर्दी होती. दोन वर्षांपासून मूर्ती बाजाराला मंदी होती. यंदा मात्र सार्वजनिकसह गल्लीतील मंडळांचा उत्साह दुणावला आहे. मंडप, छोट्या आरास आणि आरोग्यदायी कार्यक्रम राबविण्यावर यंदा मंडळांचा भर आहे. गर्दी टाळण्यासाठी यंदा देखावे राहणार नाहीत.
फूलमाळा, नवीन माळा, मोगऱ्याच्या माळा, झेंडू माळा, मोत्यांचे लटकन आदी साहित्य बाजारात आले असून त्याच्या किमतीत २५ टक्के वाढ झाली आहे. विविध आकारातील मखरही विक्रीस आले आहेत. याशिवाय मिठाईच्या दुकानांतही मोदक आकारातील पेढे विक्रीसाठी उपलब्ध आहेत.
-------
फूलमाळा, मखर, मोत्यांचे लटकन आदी साहित्याला मोठी मागणी आहे. गतवर्षीपेक्षा सजावटीच्या साहित्याचे दर २५ टक्के वाढले आहेत. घरगुती गणेशोत्सव साजरा होत असल्याने यंदा खरेदीसाठी चांगला उत्साह आहे.
- प्रसन्न एखे, सावेडी
--------
गणेश चतुर्थीला टीव्ही, मोबाईल खरेदी करण्यासाठी ग्राहकांनी बुकिंग केले आहे. ग्रामीण भागातूनही ग्राहक नगरमध्ये येत आहेत. गणेशोत्सवामध्ये बाजारपेठेत चांगली उलाढाल होईल, अशी आशा आहे.
- संकेत वाधवणे, सावेडी
-------------
पीओपीच्या मूर्ती वजनाला हलक्या, स्वस्त आणि हाताळण्यास व आकर्षक असल्याने या मूर्तींना मागणी आहे. शाडू मातीचे गणपती सर्वसामान्य ग्राहकांना परवडत नाहीत. शाडूच्या मूर्ती मोठ्या प्रमाणावर शिल्लक आहेत. गतवर्षीपेक्षा मूर्तीच्या किमतीमध्ये ४० ते ५० टक्के वाढ झाली आहे.
- ज्ञानेश्वर गाडेकर, मूर्तिकार
-------------
गणेश स्थापना मुहूर्त...
शुक्रवारी (दि. १०) सूर्योदयापासून ते दुपारी १.३० वाजेपर्यंत घरगुती गणेश मूर्तींची स्थापना करता येणार आहे. सार्वजनिक गणेश मंडळांनी सायंकाळी सातपर्यंत गणेश मूर्तीची स्थापना करावी, असे जिल्हा पुरोहित संघाचे अध्यक्ष किशोर जोशी यांनी सांगितले. पार्थिव गणेशमूर्ती असल्याने मध्यान्ह कालापर्यंत प्रतिष्ठापना करता येते, असेही त्यांनी सांगितले.
फोटो- ०८ बाजार
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नगर येथील बाजारात सजावटीचे साहित्य विक्रीस आले आहे. (छायाचित्र - साजिद शेख)
फोटो- ०८ बाजार २