रस्ते कामातील अपहारप्रकरणी विश्वास नांगरे पाटलांकडे केले पुरावे सादर
By अरुण वाघमोडे | Updated: December 1, 2023 19:06 IST2023-12-01T19:05:51+5:302023-12-01T19:06:30+5:30
यावेळी माजी नगरसेवक संजय झिंजे उपस्थित होते.

रस्ते कामातील अपहारप्रकरणी विश्वास नांगरे पाटलांकडे केले पुरावे सादर
अहमदनगर : अहमदनगर महापालिका क्षेत्रातील सुमारे ७७६ रस्त्यांच्या कामांमध्ये गुणवत्तेचे बनावट थर्ड पार्टी रिपोर्ट, टेस्ट रिपोर्ट तयार करून कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याची ऑनलाईन तक्रार काँग्रेसचे शहरजिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे राज्याचे अप्पर पोलीस महासंचालक विश्वास नांगरे पाटील यांच्याकडे केली होती. दरम्यान, शुक्रवारी मुंबई येथे काळे यांनी नांगरे पाटील यांची भेट पुरावे सादर केले. तसेच याबाबत पुढील कार्यवाहीची मागणी केली.
यावेळी माजी नगरसेवक संजय झिंजे उपस्थित होते. याबाबत काळे यांनी सांगितले की, नगर शहरातील रस्त्यांच्या दुरावस्थेला निकृष्ट कामे कारणीभूत आहेत. अधिकारी, ठेकेदार आणि त्यांना पाठीशी घालणारे मनपातील काही नगरसेवक, लोकप्रतिनिधी, राजकीय पुढारी यांनी संगनमत करून बनावट गुणवत्ता प्रमाणपत्र जोडून त्या आधारे खोटी कागदपत्रे तयार करून रस्त्यांच्या कामात अपहार केला आहे. शासकीय तंत्रनिकेतनच्या चौकशी अहवालामध्ये बनावट गुणवत्ता प्रमाणपत्र तयार करण्यात आल्याचे सिद्ध झाले आहे. नगर शहरामध्ये नागरिकांना चांगले रस्ते द्यायचे असतील तर अशा प्रकारे भ्रष्टाचार करणारे अधिकारी, ठेकेदार यांना तपास झाल्यानंतर निश्चितपणे बेड्या पडतील. त्यांना तुरुंगाची हवा खावी लागेल असा विश्वास काळे यांनी नांगरे पाटील यांच्या भेटीनंतर व्यक्त केला आहे. दरम्यान विश्वास नांगरे पाटील यांनी अँटी करप्शन नाशिक परीक्षेत्राच्या पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर -घारगे यांना याबाबत तात्काळ पुढील कारवाई करण्याचे आदेश दिल्याचे काळे यांनी सांगितले.