कोरोनामुक्त परिसर ठेवण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:20 IST2021-03-24T04:20:11+5:302021-03-24T04:20:11+5:30
भेंडा बुद्रूक (ता.नेवासा) येथील संत नागेबाबा भक्त निवासात सुरु केलेल्या शासकीय कोविड केंद्राला मंगळवारी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी ...

कोरोनामुक्त परिसर ठेवण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे
भेंडा बुद्रूक (ता.नेवासा) येथील संत नागेबाबा भक्त निवासात सुरु केलेल्या शासकीय कोविड केंद्राला मंगळवारी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी भेट देऊन पाहणी केली. कोविड कामकाजाचा आढावा घेतला.त्याप्रसंगी तालुक्यातील आरोग्य, महसूल व पोलीस प्रतिनिधींच्या बैठकीत जिल्हाधिकारी बोलत होते.
बाजार, हॉटेल, मंगल कार्यालये, सार्वजनिक ठिकाणे अशा गर्दीच्या ठिकाणी महसूल व पोलीस कर्मचाऱ्यांनी लक्ष देऊन तेथे नियंत्रण ठेवावे. आरोग्य खात्याने रुग्ण तपासणी करण्याचे काम वाढवावे. कोरोना रुग्ण आढळल्यास त्यास कोविड केंद्रात उपचारासाठी तसेच संशयित आढळल्यास घरीच विलगीकरणात ठेवावे. गृह विलगीकरणात असताना जर तो रुग्ण बाहेर फिरताना आढळल्यास त्यावर कारवाई करावी. सध्या मंगल कार्यालया ऐवजी अनेक लग्न वाड्या - वस्तीवर, घरी होत आहेत. तेथे विशेष लक्ष ठेवून नियमानुसार काम करावे. यापूर्वी कार्यरत असणाऱ्या ग्राम दक्षता समित्या कार्यरत करुन त्यांचेवर जबाबदारी सोपविण्यात येईल. ऊसतोडणी, वाहतुकीसाठी आलेल्या इतर जिल्ह्यांतील व्यक्तींच्याही तपासण्या करण्यात येतील.
कोविड आढावा बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी आधिकारी राजेंद्र क्षीरसागर , उपजिल्हाधिकारी डाॅ. श्रीनिवास अर्जुन, उपविभागीय अधिकारी गणेश पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सांगळे, तहसीलदार रुपेश सुराणा,गटविकास अधिकारी शेखर शेलार, तालुका आरोग्य अधिकारी अभिराज सूर्यवंशी, पोलीस निरीक्षक विजय करे उपस्थित होते.