विनयभंग, खंडणीच्या गुन्ह्यांतही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:19 IST2021-03-24T04:19:02+5:302021-03-24T04:19:02+5:30
अहमदनगर : यशस्वीनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे हत्याकांडातील मुख्य सूत्रधार बाळ बोठे याच्यावर खुनासह विनयभंग व खंडणी मागितल्याचाही ...

विनयभंग, खंडणीच्या गुन्ह्यांतही
अहमदनगर : यशस्वीनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे हत्याकांडातील मुख्य सूत्रधार बाळ बोठे याच्यावर खुनासह विनयभंग व खंडणी मागितल्याचाही गुन्हा दाखल आहे. या दोन गुन्ह्यांत कोतवाली व तोफखाना पोलीस त्याची स्वतंत्र चौकशी करणार आहेत.
जरे हत्याकांड प्रकरणात बोठे सध्या पोलीस कोठडीत आहे. २५ मार्च रोजी त्याची कोठडी संपणार असल्याने पोलीस त्याला न्यायालयात हजर करणार आहेत. बोठे याला न्यायालयीन कोठडी मिळाली तर कोतवाली पोलीस न्यायालयात अर्ज करून त्याला विनयभंगाच्या गुन्ह्यात वर्ग करून घेण्याची मागणी करणार आहेत. जरे यांचे हत्याकांड झाल्यानंतर काही दिवसांनी बोठे याच्या विरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात एका विवाहित महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच तोफखाना पोलीस ठाण्यातही एका महिलेच्या फिर्यादीवरून बोठे याच्याविरोधात खंडणी व बदनामी केल्याचा गुन्हा दाखल आहे. त्यामुळे आणखी दोन गुन्ह्यांत बोठे याला चौकशीला सामोरे जावे लागणार आहे.
..............
बोठेचा पोलीस कोठडीतील मुक्काम वाढला
बाळ बोठे याचा पोलीस कोठडीतील मुक्काम आणखी दोन दिवसांनी वाढला आहे. मंगळवारी न्यायालयाने त्याला २५ मार्चपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. नगर येथून पसार झाल्यानंतर बोठे याने कुठे आश्रय घेतला तसेच त्याला कुणी आर्थिक मदत केली, हैदराबाद येथे जाण्याआधी तो कुठे थांबला होता, आदी बाबींचा तपास करावयाचा असल्याने आरोपीच्या कोठडीत वाढ करावी, अशी मागणी सरकारी पक्षाच्या वतीने ॲड. मनीषा डुबे पाटील यांनी केली होती.