अभियंता पालवेंना सभागृहाबाहेर काढले

By Admin | Updated: June 24, 2014 00:06 IST2014-06-23T23:48:36+5:302014-06-24T00:06:01+5:30

अहमदनगर : जिल्हा परिषद सदस्य तुकाराम शेंडे आणि कार्यकारी अभियंता दिलीप पालवे प्रकरणावरून गरमागरमीत सुरू झालेली जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा अखेरपर्यंत गाजली.

Engineer Palwena was removed from the house | अभियंता पालवेंना सभागृहाबाहेर काढले

अभियंता पालवेंना सभागृहाबाहेर काढले

अहमदनगर : जिल्हा परिषद सदस्य तुकाराम शेंडे आणि कार्यकारी अभियंता दिलीप पालवे प्रकरणावरून गरमागरमीत सुरू झालेली जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा अखेरपर्यंत गाजली. आरोग्य विभागाच्या कामकाजातील त्रुटी, बनावट अपंग प्रमाणपत्र प्रकरण, एक्सपे्रस फिडर या विषयांवर सभागृहात खडाजंगी होऊन सदस्यांनी कारभाराचे वाभाडे काढले.
सभेच्या सुरूवातीला सदस्य राजेंद्र फाळके यांनी तुकाराम शेंडे यांचा कार्यकारी अभियंता पालवे यांनी अपमान केला असून अशा मुजोर अधिकाऱ्याला सभागृहात बसण्याचा अधिकार नाही. पालवे यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्या सोबतच त्यांना शासनाने परत बोलवावे असा ठराव करण्याची मागणी त्यांनी केली. सदस्य बाळासाहेब हराळ यांनी ही मागणी उचलून धरली. जिल्हा परिषदेतील अधिकारीशाही कोणत्या दिशेने चालली आहे, असा सवाल त्यांनी केला.
त्यावर अध्यक्ष विठ्ठलराव लंघे यांनी पालवे यांनी सदस्य शेंडे यांची माफी मागितली आहे. त्यावर हराळ यांनी माफी मागून प्रश्न सुटणार नाही, पालवे सभागृहात थांबणार असतील तर सभागृह चालू न देण्याचा इशारा दिला. अखेर लंघे यांनी पालवे यांना सभागृहा बाहेर जाण्याचे आदेश दिले. फाळके यांनी पालवे यांच्या विरोधात ठराव करून शासनाला पाठविण्याची मागणी केली. हराळ यांनी याबाबत ठराव मांडला. सदस्य सुभाष पाटील यांनी पालवे प्रकरणाची चौकशी करूनच कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली. यावरून फाळके, हराळ विरूध्द पाटील असा शाब्दिक वाद रंगला.
अखेर पाटील यांनी पालवे यांचेसोबत शेंडे यांनी दहा हजार रुपयांची लाच दिलेली असल्याने त्यांचीही चौकशी व्हावी, अशी मागणी केली. अखेर अध्यक्ष लंघे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांचेकडून आठ दिवसांत चौकशी करून पालवे दोषी आढळल्यास कारवाई करण्याचा निर्णय घेतला. अण्णासाहेब शेलार यांनी पालवे यांची चौकशी होईपर्यंत त्यांना रजेवर पाठविण्याची मागणी केली.
प्रश्नोत्तराच्या तासात शरद नवले यांनी एक्सपे्रस फिडरबाबत विचारणा केली. दोन वर्षापूर्वी जिल्हा परिषदेच्या विद्युत विभागाने दिलेले उत्तर आजही कायम आहे. या लाईनसाठी जिल्हा परिषदेने ३४ लाख रुपये खर्च केलेले आहेत. तरीही वीज नसल्याबद्दल आणि अधिकारी वारंवार तेचतेच उत्तर देत असल्याचे नवल यांचे म्हणणे होते. संरक्षण विभागातील त्रुटी मार्गी लावण्याचे आश्वासन सदस्य सचिन जगताप यांनी दिले.
दूषित पाणी प्रश्न हराळ यांनी आरोग्य अधिकारी डॉ. गंडाळ यांना धारेवर धरले. दूषित पाण्यामुळे भूगर्भातील पाण्याचे स्त्रोत खराब होत आहेत. वाळकी गटात गेल्या वर्षी साथजन्य आजारात तिघांचा बळी गेला आहे. जिल्ह्यात प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या ३० जागा रिक्त आहेत. १४ ठिकाणी शस्त्रक्रियागृह बंद आहेत.
शिक्षकांच्या बनावट अपंग प्रकरणी हराळ यांनी प्रशासनाला धारेवर धरले. जिल्हा परिषदेने दोषी ठरवलेल्या पैकी ४८ शिक्षकांना साहय्यक आयुक्त चौकशी यांनी कसे निर्दोष ठरविले. जर ते निर्दाेष असतील जिल्हा प्रशासन दोषी का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. त्यावर मुख्य कार्यकारी अधिकारी नवाल यांनी या प्रकरणी विभागीय आयुक्तांना सविस्तर अहवाल सादर करून मार्गदर्शन घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. बोगस प्रमाणपत्र देणाऱ्या जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांवर कारवाई करणार का? असा प्रश्न हराळ यांनी उपस्थित केला. या विषयावर जगताप, आझाद ठुबे यांनी चर्चा केली.
मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या गाडीचा दिवा बदला
1सदस्य मिनाक्षी थोरात यांनी राज्यातील मुख्य कार्यकारी यांनी त्यांच्या गाडीवर पिवळ्या दिव्या ऐवजी निळा दिवा वापरण्याचे आदेश सरकारने दिलेले आहेत. मात्र, नगरमध्ये त्याची अंमलबजावणी होत नसल्याचे निदर्शनास आणून दिले.
2हरियाली योजनेत मोठा गैरव्यवहार झाला असल्याचा संशय व्यक्त होत आहे. यामुळे या योजनेत झालेल्या कामांची येत्या महिन्याभरात चौकशी करून अहवाल सादर करण्यात येणार असल्याचे कॅफो अरूण कोल्हे यांनी सांगितले.
3मिरजगावात डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे महिलेची रस्त्यावर प्रसृती झाली. यामुळे येथील प्राथमिक केंद्रातील डॉक्टरांवर कारवाई व्हावी अशी मागणी सदस्य परमवीर पांडूळे यांनी केली. अध्यक्ष लंघे यांनी डॉ. गंडाळ यांना आरोग्य बाबत गंभीर तक्रारी असल्याचे सुनावले. चापडगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील त्रुटी दोन दिवसांत पूर्ण करण्याचे आदेश त्यांनी दिले.
4देशात लोकसभा निवडणुकांमध्ये एनडीएचे सरकार अस्तित्वात आले आहे. बहुमताने त्यांनी सत्ता मिळविली असल्याने जिल्हा परिषदेकडून अभिनंदनाचा ठराव मांडण्यात आला. हा ठराव सदस्य अ‍ॅड. सुभाष पाटील यांनी मांडला.

Web Title: Engineer Palwena was removed from the house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.