शेवगावात लवकरच अतिक्रमण हटाव मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2021 04:13 IST2021-02-19T04:13:30+5:302021-02-19T04:13:30+5:30

शेवगाव : गुरुवारी झालेल्या बैठकीत प्रशासक तथा प्रांताधिकारी देवदत्त केकाण यांनी नगर परिषदेच्या प्रलंबित विषयांना मंजुरी दिली. यामध्ये शहरातील ...

Encroachment removal campaign in Shevgaon soon | शेवगावात लवकरच अतिक्रमण हटाव मोहीम

शेवगावात लवकरच अतिक्रमण हटाव मोहीम

शेवगाव : गुरुवारी झालेल्या बैठकीत प्रशासक तथा प्रांताधिकारी देवदत्त केकाण यांनी नगर परिषदेच्या प्रलंबित विषयांना मंजुरी दिली. यामध्ये शहरातील कच्चे व पक्के अतिक्रमण हटविणे, नगर परिषद मालकीच्या गाळ्यांचा फेर लिलाव, आठवडे बाजार वसुली ठेका, थकीत वीजबिल, पाणी पट्टी भरणे, मैला व्यवस्थापन प्रस्ताव मंजुरीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविणे आदी विषयांना मंजुरी देण्यात आल्याचे मुख्याधिकारी अंबादास गर्कळ यांनी सांगितले.

शहरातील रस्त्याच्या बाजूची अतिक्रमणे नागरिकांनी स्वतः येत्या आठ दिवसात हटवावी. तसे न केल्यास ही अतिक्रमणे नगर परिषद, महसूल, पोलीस, सार्वजनिक बांधकाम विभाग आदींची पथके हटवितील. त्याचा खर्च अतिक्रमणधारकांना भरावा लागणार आहे. पुढील आठवड्यामध्ये गुरुवार व शुक्रवारी अतिक्रमण मोहीम राबविण्यात येणार आहे. नगर परिषदेच्या मालकीची शहरातील ३३ गाळ्यांचे नव्याने लेखापरीक्षण करण्यात येणार असून, त्यांचा फेरलिलाव होणार आहे. रोज भरणारा बाजार व आठवडे बाजार वसुलीसाठी नव्याने ठेका देण्यासाठी निविदाप्रक्रिया राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

कर्मचाऱ्यांचा भविष्य निर्वाह निधीचे ऑनलाइन पद्धतीने चलन भरण्यासाठी ॲडमिन खर्चाला मान्यता देण्यात आली. नागरीवस्ती विस्तारासाठी शेती खाली असलेल्या जमिनीचे रूपांतर रहिवासी क्षेत्रात (एलो झोन) आवश्यकतेनुसार करण्याचा प्रस्ताव वरिष्ठांकडे मंजुरीसाठी सादर करण्यात येणार आहे. याचबरोबर मैला व्यवस्थापन प्रकल्प उभारण्यासाठी जमीन खरेदीचा प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्या मंजुरीसाठी पाठविण्यात येणार आहे. नगर परिषदेच्या उत्पन्नात वाढ व्हावी या उद्देशाने शहरातील सर्व विविध मालमत्ता फेरसर्वेक्षण करण्यासाठी निविदा मागविण्यात येणार असून, यासाठी प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे शहरातील सर्व मालमत्ता मोजण्यात येऊन फेरकर आकारणी केली जाणार आहे.

----

शहरातील हातपंपांचीही दुरुस्ती होणार..

शहरात ३८ हातपंप आहेत. त्यातील काही हातपंपांची याआधीच दुरुस्ती झाली. उर्वरित हातपंपांची दुरुस्ती केली जाणार आहे. नागरिकांनी आपल्या घराच्या शेजारी एखादा हातपंप ना दुरुस्त असेल तर तत्काळ नगर परिषदेला कळवावे, असे आवाहन देवदत्त केकाण यांनी केले आहे.

Web Title: Encroachment removal campaign in Shevgaon soon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.