देणगीच्या वस्तू चोरणारा संस्थान कर्मचारी अटकेत
By Admin | Updated: July 10, 2014 00:36 IST2014-07-09T23:47:00+5:302014-07-10T00:36:24+5:30
शिर्डी : साईबाबांना आलेल्या देणगीची मोजणी कक्षात मोजदाद करणाऱ्या एका संस्थान कर्मचाऱ्याला सोने-चांदीच्या जवळपास पावणे बारा हजारांच्या वस्तू चोरतांना सुरक्षा रक्षकांनी रंगेहात पकडले.

देणगीच्या वस्तू चोरणारा संस्थान कर्मचारी अटकेत
शिर्डी : साईबाबांना आलेल्या देणगीची मोजणी कक्षात मोजदाद करणाऱ्या एका संस्थान कर्मचाऱ्याला सोने-चांदीच्या जवळपास पावणे बारा हजारांच्या वस्तू चोरतांना सुरक्षा रक्षकांनी रंगेहात पकडले.दिनकर हनुमंता डोखे असे या कायम कर्मचाऱ्याचे नाव आहे़
साईसंस्थानला भाविकांनी अर्पण केलेल्या देणगीची दर मंगळवारी व शनिवारी मोजदाद करण्यात येते़ मंगळवारी सकाळी ही मोजदाद करुन बाहेर पडत असलेल्या डोखे यांच्या हाताच्या मुठीत सोन्याच्या नाण्यासह चार ग्रॅम सोन्याचे तुकडे व काही चांदीच्या वस्तू आढळून आल्याने सुरक्षा रक्षकांनी त्यांना ताब्यात घेतले़ या वस्तुंची किंमत अकरा हजार सातशे पासष्ट रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले़ या संदर्भात संस्थानचा सुरक्षा रक्षक प्रभुधर यौहान पठारे यांच्या फिर्यादीवरुन पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे़ विशेष म्हणजे मंगळवारी सकाळी अकराच्या सुमारास घडलेल्या या घटनेचा गुन्हा तब्बल बारा तासांनी दाखल करण्यात आला़ पोलीस उपनिरीक्षक कहाळे या घटनेचा तपास करीत आहेत़ (तालुका प्रतिनिधी)
कॅमेऱ्यात आरोपी कैद
संस्थानने देणगी मोजदाद कक्षात अनेक क्लोज सर्किट कॅमेरे बसवलेले आहेत़ त्या कॅमेऱ्यात दिसलेल्या संशयास्पद हालचाली वरुन सुरक्षा रक्षकांनी आरोपीला पकडल्याचे सांगण्यात येते़ या घटनेत पकडण्यात आलेले कर्मचारी डोखे हे तीन वर्षानंतर सेवानिवृत्त होणार होते़