वेळू सेवा संस्थेत अपहार, २८ जणांवर गुन्हा
By | Updated: December 5, 2020 04:34 IST2020-12-05T04:34:32+5:302020-12-05T04:34:32+5:30
श्रीगोंदा/आढळगाव : श्रीगोंदा तालुक्यातील वेळू सेवा सहकारी संस्थेमध्ये १६ लाख ६८ हजार ८५४ रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी संस्थेचे तत्कालीन ...

वेळू सेवा संस्थेत अपहार, २८ जणांवर गुन्हा
श्रीगोंदा/आढळगाव : श्रीगोंदा तालुक्यातील वेळू सेवा सहकारी संस्थेमध्ये १६ लाख ६८ हजार ८५४ रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी संस्थेचे तत्कालीन पदाधिकारी, सचिव आणि संचालक मंडळासह २८ जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. जिल्हा बँक कर्ज अधिकारी शिवाजी छगन मोटे यांच्यावरही अपहारप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.
तालुक्यातील सहकारी संस्थांमधील गुन्हा दाखल झालेले हे नजीकच्या काळातील तिसरे प्रकरण असून, आणखी सहा संस्थांचे चाचणी आणि फेर लेखापरीक्षण सुरू आहे. तालुक्यातील वेळू सेवा सहकारी संस्थेमध्ये आर्थिक अफरातफर झाल्याची शंका आल्यामुळे जिल्हा उपनिबंधकांच्या आदेशानुसार संस्थेचे १ एप्रिल २००९ ते ३१ मार्च २०१७ या कालावधीतील फेर लेखापरीक्षण करण्यात आले.
संस्थेचे त्या कालावधीतील अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक मंडळ आणि सचिव यांनी संस्थेच्या दप्तरामध्ये अफरातफर करून जिल्हा बँकेच्या कर्ज अधिकाऱ्याला हाताशी धरून पहिले कर्ज थकीत असताना दुबार कर्ज वाटप करून गैरव्यवहार केल्याचे उघड झाले. ७ लाख ३७ हजार रुपये ११ कर्जदारांकडून वसुली करूनही संस्थेच्या हिशोबामध्ये घेतले नाही. १ लाख ७५ हजार रुपयांचे कर्ज वाटप कर्जदारांनी अमान्य केले आहे. ७ लाख २७ हजार ९६२ रुपयांचे कर्ज थकीत असताना १२ ते २६ कर्जदारांना दुबार कर्ज वाटप करून त्यांचे कर्जरोखे नष्ट केले आहेत. ४ हजार ८३७ रुपये विना व्हाऊचर खर्च, तसेच २४ हजार रुपये विना परवानगी जादा मेहनताना सचिव आणि सहसचिवांनी परस्पर लाटला. असा एकूण १६ लाख ६८ हजार ८५४ रुपयांचा अपहार झाल्याचा गुन्हा विशेष लेखापरीक्षक सुनील नामदेव खर्डे यांनी २८ जणांवर श्रीगोंदा पोलीस ठाण्यात दाखल केला आहे.
जिल्हा बँक कर्ज अधिकारी शिवाजी छगन मोटे यांचा आरोपींमध्ये समावेश आहे.
आरोपींची नावे खालीलप्रमाणे - संजय प्रेमराज आगविले (तत्कालीन अध्यक्ष), वसंत यशवंत औटी (मयत), रामदास नामदेव हराळ, जगन्नाथ विठोबा डेबरे, दादाराम संभाजी पिंपळे, सुदाम पोपट पिंपळे, धनंजय किसन पिंपळे, सुदाम सीताराम औटी, बन्सी बाबूराव पाचारणे, राजू धोंडीबा सांगळे, गणेश माधव येडे, नागनाथ राजाराम पिंपळे, सुलोचना माधव पिंपळे, पोपट निवृत्ती चिखलठाणे, मारुती विष्णू अनभुले (तत्कालीन सचिव, मयत), नितीन वसंत औटी (तत्कालीन अध्यक्ष), मारुती एकनाथ देवखिळे, नवनाथ एकनाथ वडवकर, शिवाजी गंगाराम पिंपळे, रावसाहेब मोहन येडे, पंडितराव विनायक पाटील, लक्ष्मण यादव देवखिळे, विजय रामराव चोर, दिलीप धोंडीबा सांगळे, अलका दिलीप डेबरे, लता पांडुरंग वडवकर, सुनीता संदीप पायमोडे.