नगरमध्ये १५ फेब्रुवारीपासून अकरावा प्रतिबिंब चित्रपट महोत्सव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2018 16:54 IST2018-02-13T16:54:01+5:302018-02-13T16:54:30+5:30
जगभरात गाजलेले चित्रपट अगदी मोफत पाहण्याची सुवर्णसंधी दरवर्षी न्यू आर्टस् महाविद्यालयाच्या संज्ञापन अभ्यास विभागाच्या प्रतिबिंब चित्रपट महोत्सवात नगरकरांना मिळते. या वर्षी ११ वा प्रतिबिंब चित्रपट महोत्सव १५ ते १८ फेब्रुवारी दरम्यान होत आहे.

नगरमध्ये १५ फेब्रुवारीपासून अकरावा प्रतिबिंब चित्रपट महोत्सव
अहमदनगर : जगभरात गाजलेले चित्रपट अगदी मोफत पाहण्याची सुवर्णसंधी दरवर्षी न्यू आर्टस् महाविद्यालयाच्या संज्ञापन अभ्यास विभागाच्या प्रतिबिंब चित्रपट महोत्सवात नगरकरांना मिळते. या वर्षी ११ वा प्रतिबिंब चित्रपट महोत्सव १५ ते १८ फेब्रुवारी दरम्यान होत आहे. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांच्या हस्ते प्रतिबिंब महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे.
हा महोत्सव महाविद्यालयातील राजर्षी शाहू महाराज सभागृहात आयोजित करण्यात आलेला असून रसिकांना सकाळी ९ ते रात्री ९ या वेळेत पाहता येईल. १५ व १६ फेब्रुवारी रोजी जगभरातील गाजलेले काही निवडक चित्रपट दाखवण्यात येणार आहेत. १७ व १८ फेब्रुवारी रोजी लघुपट आणि माहितीपट स्पर्धेत मानांकन मिळालेले लघुपट व माहितीपट दाखविले जाणार आहेत. विद्यार्थी आणि खुला गट अशा दोन गटात लघुपट व माहितीपटांची विभागणी करण्यात आलेली असून पहिल्या तीन क्रमांकासाठी पारितोषिके देण्यात येणार असून इतरही काही वैयक्तिक पारितोषिके देण्यात येणार असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. एच. झावरे यांनी दिली.
‘बायोग्राफिकल फिल्म्स’ अशी या वर्षीच्या प्रतिबिंब महोत्सवात दाखविण्यात येणा-या चित्रपटांची प्रमुख थीम आहे. जगातील नावाजलेल्या व्यक्तींच्या चरित्रावर आधारित चित्रपटांचा यामध्ये समावेश आहे. या महोत्सवाचा लाभ घ्यावा व अहमदनगरकरांना कलात्मक चित्रपट पाहण्याची संधी मिळावी, जागतिक चित्रपटांची तोंड ओळख व्हावी आणि अहमदनगरमध्ये चित्रपट संस्कृती वाढीस लागावी, असा उद्धेश या चित्रपट महोत्सवाचा असल्याची माहिती संज्ञापन अभ्यास विभाग प्रमुख प्रा. बापू चंदनशिवे यांनी दिली. रसिक प्रेक्षकांसाठी सदर चित्रपट महोत्सव विनामुल्य पाहता येणार असून प्रवेशिका महाविद्यालयातील संज्ञापन विभागात उपलब्ध करून देण्यात आल्या असल्याची माहिती या महोत्सवाचे संचालक प्रा. राहुल चौधरी यांनी दिली.