संगमनेरातील प्रशासकीय भवनातील लिफ्ट बंद
By | Updated: December 5, 2020 04:37 IST2020-12-05T04:37:49+5:302020-12-05T04:37:49+5:30
संगमनेर : शहरातील नवीन नगर रस्त्यावरील यशवंतराव चव्हाण प्रशासकीय भवनातील लिफ्ट नेहमीच बंद असते. त्यामुळे येथील शासकीय कार्यालयांमध्ये येणाऱ्या ...

संगमनेरातील प्रशासकीय भवनातील लिफ्ट बंद
संगमनेर : शहरातील नवीन नगर रस्त्यावरील यशवंतराव चव्हाण प्रशासकीय भवनातील लिफ्ट नेहमीच बंद असते. त्यामुळे येथील शासकीय कार्यालयांमध्ये येणाऱ्या दिव्यांग व्यक्ती, ज्येष्ठ नागरिकांना पायऱ्या चढून जावे लागत असल्याने त्यांचे हाल होत आहेत. प्रशासकीय भवनातील लिफ्ट सुरू करण्याची मागणी नागरिकांमधून केली जात आहे.
यशवंतराव चव्हाण प्रशासकीय भवनात प्रांत कार्यालयासह उपविभागीय, तालुका कृषी अधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी, दुय्यम उपनिबंधक, पोस्ट यासह इतरही शासकीय कार्यालये आहेत. या कार्यालयांमध्ये कामानिमित्त दररोज शेकडो नागरिक येत-जात असतात. भव्य अशा प्रशासकीय भवनात नागरिकांची नेहमीच गर्दी असते. या भवनात सुविधा असूनही नागरिकांना त्याचा उपयोग होत नाही. येथे येणाऱ्या नागरिकांमध्ये दिव्यांग व्यक्ती, ज्येष्ठ नागरिक ही असतात. लिफ्ट बंद असल्याने त्यांना पायऱ्या चढून जावे लागते. दिव्यांग व्यक्तींना कुबड्या घेऊन पायऱ्या चढता येत नाही, त्यांचा तोल जातो. इतरांच्या मदतीने त्यांना शासकीय कार्यालय गाठावे लागते. अनेकांना चालता येत नसल्याने पायऱ्यांवर हात टेकून जिणे चढावे लागतात. त्यामुळे हाता-पायांना, कपड्यांना धुळ लागते. दिव्यांग महिलांचे तर मोठे हाल होतात. ज्या ज्येष्ठ नागरिकांना पायऱ्या चढणे शक्य नाही, अशा नागरिकांना उचलून न्यावे लागते. त्यामुळे किमान दिव्यांग व्यक्ती, ज्येष्ठ नागरिकांसाठी तरी ही लिफ्ट सुरू करावी, अशी मागणी नागरिकांमधून होते आहे.
चौकट
अधिकाऱ्यांसाठी लिफ्ट
यशवंतराव चव्हाण प्रशासकीय भवनात सभागृह असून येथे मंत्री, खासदार, आमदार, जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक या अधिकाऱ्यांची जेव्हा बैठक होते. तेव्हा त्यांच्यासाठी लिफ्ट सुरू केली जाते. मात्र, पायऱ्या चढणे शक्य नसलेले दिव्यांग बांधव, ज्येष्ठ नागरिक यांना गरज असूनही लिफ्टची सुविधा उपलब्ध करून दिली जात नाही.
कोट
प्रशासकीय भवनात लिफ्टची सुविधा आहे. परंतू आमच्या दिव्यांग बांधवांना या सुविधेचा लाभ मिळत नाही. त्यामुळे सर्वच शासकीय कार्यालयातील अधिकाऱ्यांनी दिव्यांग बांधवांना लिफ्टच्या सुविधेचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत.
- जालिंदर लहामगे, अहमदनगर जिल्हाध्यक्ष, दिव्यांग सहाय्य सेना, शिवसेना