नगर तालुक्यातील दोन ग्रामपंचायती वगळता सर्वत्र निवडणुका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:06 IST2021-01-08T05:06:29+5:302021-01-08T05:06:29+5:30
केडगाव : नगर तालुक्यात ५९ ग्रामपंचायतींपैकी केवळ वारुळवाडी, दशमीगव्हाण या दोन ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या. बिनविरोधचा निर्णय अंतिम होऊनही तालुक्यातील ...

नगर तालुक्यातील दोन ग्रामपंचायती वगळता सर्वत्र निवडणुका
केडगाव : नगर तालुक्यात ५९ ग्रामपंचायतींपैकी केवळ वारुळवाडी, दशमीगव्हाण या दोन ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या. बिनविरोधचा निर्णय अंतिम होऊनही तालुक्यातील पाच गावे निवडणुकीला सामोरे जात आहेत. तालुक्यातील ५७ ग्रामपंचायतींमध्ये आता निवडणूक हाेणार आहे.
नगर तालुक्यातील ५९ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी सोमवारी अर्ज मागे घेण्याची अखेरची मुदत होती. यात ५९ पैकी केवळ वारुळवाडी, दशमीगव्हाण गावातील निवडणूक बिनविरोध झाली. तालुक्यातील तांदळी वडगाव, आंबिलवाडी, घोसपुरी, शिराढोण या गावात बिनविरोध निवडणुकीचा निर्णय झाला होता; मात्र ऐनवेळी काही उमेदवारांनी अर्ज मागे घेण्यास नकार दिल्याने या गावातील बिनविरोध निवडणुकीच्या निर्णयाचा फज्जा उडाला. तसेच खडकी, अकोळनेर व हिवरेबाजार येथील निवडणुका बिनविरोध करण्यासाठी बैठकांच्या फेऱ्या झडल्या. मात्र ऐनवेळी जागा वाटपात वाद झाल्याने येथे आता रंगतदार निवडणूक होत आहे. यावेळीही बुऱ्हाणनगर गावात बिनविरोध निवडीची परंपरा खंडित झाली. कर्डिले यांनी जेऊर ग्रामपंचायत बिनविरोधसाठी प्रयत्न केले. मात्र ऐनवेळी त्यास यश मिळाले नाही.
आमदार नीलेश लंके यांनी खडकी, अकोळनेर, घोसपुरी या गावातील निवडणुका बिनविरोधसाठी शर्थीचे प्रयत्न केले. दहा ते बारा बैठका घेतल्या. मात्र शेवटच्या क्षणी त्यात ते अपयशी ठरले.
---
दिग्गजांचे दिवसभर घडामोडींवर लक्ष..
नगर तालुक्यातील काही गावात निवडणुका बिनविरोध करण्यासाठी तर काही ठिकाणी बिनविरोध होऊ नये यासाठी वरिष्ठ पातळीवरून प्रयत्न झाले. राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, आमदार नीलेश लंके, आमदार अरुण जगताप, माजी आमदार शिवाजी कर्डिले, प्रा. शशिकांत गाडे यांनी व्यक्तीगत लक्ष घालून ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी केली. प्रत्येक गावातील राजकीय घडामोडींकडे या दिग्गजांनी लक्ष घातले.
----
दोन तास मनधरणी तरी अर्ज कायम..
नवनागापूर येथील एका जागेतील उमेदवाराने माघार घ्यावी यासाठी महापौर बाबासाहेब वाकळे यांच्यासह राष्ट्रवादीतील मनपाचे ७ नगरसेवक दोन तास तहसील कार्यालयात ठाण मांडून होते. एका जागेवरील उमेदवाराने अर्ज मागे घेण्यासाठी त्यांनी मनधरणी केली. मात्र एवढे प्रयत्न करूनही त्यांना यश मिळाले नाही.
फोटो ०४ नगर ग्रामपंचायत
नगर तहसील कार्यालय परिसरात ग्रामपंचायत निवडणूक अर्ज माघारीच्या अखेरच्या दिवशी झालेली गर्दी.