थोरात-विखेंभोवतीच निवडणूक
By Admin | Updated: May 31, 2016 23:08 IST2016-05-31T23:00:01+5:302016-05-31T23:08:00+5:30
रियाज सय्यद ल्ल संगमनेर नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. सत्ताधाऱ्यांचे अस्तित्व टिकविण्यासाठी माजी

थोरात-विखेंभोवतीच निवडणूक
रियाज सय्यद ल्ल संगमनेर
नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. सत्ताधाऱ्यांचे अस्तित्व टिकविण्यासाठी माजी मंत्री आ. बाळासाहेब थोरात व आ. डॉ. सुधीर तांबे यांनी लक्ष घातले आहे, तर विरोधकांना ताकद देण्यासाठी ‘प्रवरे’ची मदत घेण्याची व्यूहरचना आखली जात आहे. त्यामुळे यंदाची निवडणूक गाजण्याची चिन्हे आहेत.
नगरपरिषदेची निवडणूक काही महिन्यांवर येवून ठेपल्याने विकासकामांनी जोर धरला आहे. शहरातील चौका-चौकात, गल्ली-बोळात कधी नव्हे इतके फलक लागले आहेत. निळवंडे धरणातून शहरासाठी थेट पाईपलाईन हा सत्ताधाऱ्यांचा निवडणूक प्रचाराचा प्रमुख मुद्दा असणार आहे. नळांना प्रायोगिक तत्वावर का होईना, मीटर बसविण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. परंतु मीटरमुुळे दुपटीने वाढणारी पाणीपट्टी हा कळीचा मुद्दा आहे. शहरातील अतिक्रमणे, सिंहस्थ कुंभमेळा निधीतील अर्धवट बायपास रस्ता, म्हाळूंगी नदी पात्राची अस्वच्छता यासारखे प्रश्न ऐरणीवर आहेत. राज्यात युती सरकार आरूढ असल्याने विरोधी भाजपा-सेना कार्यकर्ते सक्रिय झाले आहेत. विरोधकांकडून दगाफटका होऊ नये याची काळजी सत्ताधारी आतापासूनच घेत आहेत, तर विरोधी राष्ट्रवादी, शिवसेना, भाजपा व इतर मित्र पक्षांच्या देखील हालचाली सुरू आहेत. मात्र गट-तटाच्या राजकारणामुळे विरोधकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. अशावेळी सत्ताधाऱ्यांना शह देण्यासाठी विरोधक ‘विखे’ गटाची ताकद घेण्याच्या तयारीत आहेत. सय्यद बाबा ऊरूसात ‘थोरात-विखे’ वादाची पडलेली ठिणगी नगरपरिषद निवडणुकीच्या निमित्ताने पेट घेण्याची शक्यता नाकारता येत नाही.