अठरा तासानंतर तरुणाचा मृतदेह सापडला; विहिरीत उडी मारून केली आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2020 16:21 IST2020-05-08T16:21:01+5:302020-05-08T16:21:40+5:30
अहमदनगर शहरातील गुलमोहर रोड परिसरातील तांबटकर मळा येथील एका विहिरीत उडी मारुन आत्महत्या केलेल्या तरुणाचा तब्बल १८ तासानंतर मृतदेह शोधून काढण्यात पोलिसांना यश आले आहे

अठरा तासानंतर तरुणाचा मृतदेह सापडला; विहिरीत उडी मारून केली आत्महत्या
अहमदनगर : शहरातील गुलमोहर रोड परिसरातील तांबटकर मळा येथील एका विहिरीत उडी मारुन आत्महत्या केलेल्या तरुणाचा तब्बल १८ तासानंतर मृतदेह शोधून काढण्यात पोलिसांना यश आले आहे. शकील सजन शेख (वय ३२ रा. तांबटकर मळा, नगर) असे मयत तरुणाचे नाव आहे.
तांबटकरमळा येथील एका विहिरीच्या काठावर शुक्रवारी सायंकाळी चार ते पाच वाजेच्या सुमारास स्थानिक नागरिकांना कपडे, मोबाईल व एक चिठ्ठी आढळून आली. या चिट्ठीत आत्महत्या करीत असल्याबाबत लिहिलेले होते. नागरिकांनी याबाबत तोफखाना पोलिसांना माहिती दिली. तोफखाना पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षक किरण सुरसे हे पथकासह घटनास्थळी दाखल झाले. कपडे व मोबाईल हे तांबटकर मळा परिसरात राहणाºया शकील शेख याचे असल्याचे पोलिसांना समजले. यावेळी पोलिसांनी शेख याच्या नातेवाईकांना बोलावून विहिरीत मृतदेहाचा शोध घेण्याचे काम सुरू केले. या विहिरीत मात्र भरपूर पाणी व खाली गाळ साचला असल्याने मृतदेह सापडत नव्हता. पोलिसांनी विहिरीत गळ टाकून पाहिले तरीही मृतदेहाचा शोध लागला नाही. त्यानंतर पाण्यातील कॅमेरा आणून विहिरीत सोडण्यात आला. मात्र मृतदेह त्या कॅमे-यातही निदर्शनास आला नाही. रात्री साडे दहा ते अकरा वाजेपर्यंत पोलिसांनी मृतदेहाचा शोध घेतला. शुक्रवारी सकाळी पुन्हा शोध मोहीम सुरू करण्यात आली. यावेळी गोताखोर बोलाविण्यात आले. त्यांनी विहिरीत सर्वत्र शोध घेतल्यानंतर अखेर शकील शेख याचा मृतदेह आढळून आला. शकील याने आत्महत्या कोणत्या कारणामुळे केली हे समोर आलेले नाही. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.