धान्याची उचल न केल्याने राज्यातील आठ लाख शिधापत्रिका बाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:42 IST2021-02-05T06:42:19+5:302021-02-05T06:42:19+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क अहमदनगर : काही शिधापत्रिकाधारक धान्याची उचल करीत नसल्याचे लक्षात आल्यानंतर अन्न व नागरी पुरवठा विभागाने ऑगस्ट ...

Eight lakh ration cards in the state were rejected due to non-lifting of foodgrains | धान्याची उचल न केल्याने राज्यातील आठ लाख शिधापत्रिका बाद

धान्याची उचल न केल्याने राज्यातील आठ लाख शिधापत्रिका बाद

लोकमत न्यूज नेटवर्क

अहमदनगर : काही शिधापत्रिकाधारक धान्याची उचल करीत नसल्याचे लक्षात आल्यानंतर अन्न व नागरी पुरवठा विभागाने ऑगस्ट ते डिसेंबर २०२० या कालावधीतील धान्य उचलीची तपासणी केली. त्यामध्ये राज्यातील ७ लाख ९५ हजार १६८ शिधापत्रिकाधारकांनी पाच महिने धान्याची उचल केली नसल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे या शिधापत्रिका तात्पुरत्या स्वरुपात बाद करण्यात आल्या आहेत.

सार्वजनिक वितरण व्यवस्थेच्या संगणकीकरण प्रकल्पांतर्गत शिधापत्रिकेला आधार लिंक करण्याची प्रक्रिया कार्यान्वित करण्यात आली आहे. या प्रणालीद्वारे बायोमॅट्रिक ओळख पटवून शिधावस्तूंचे वाटप करण्यात येते. या प्रणालीद्वारे धान्याचे वाटप करताना काही शिधापत्रिकाधारक धान्याची उचल करीत नसल्याचे आढळून आले असल्याचे अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे. ऑगस्ट ते डिसेंबर -२०२० या पाच महिन्यांच्या कालावधीतील ही आकडेवारी आहे. राज्यात धान्याची उचल करणाऱ्यांचे प्रमाण ८८ ते ९० टक्के इतके आहे. बाद झालेल्या एकूण ७ लाख ९१ हजार शिधापत्रिकांमध्ये अंत्योदय योजनेतील ६६ हजार ४० शिधापत्रिकांचा समावेश आहे, तर प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजनेतील ७ लाख २९ हजार १२८ शिधापत्रिकांचा समावेश आहे.

-------

शिधापत्रिकांचे तात्पुरते निलंबन

पाच महिन्यांच्या कालावधीपर्यंत धान्य उचल न केलेल्या शिधापत्रिकांची तपासणी होईपर्यंत या शिधापत्रिकेवरील धान्य तात्पुरत्या स्वरुपात निलंबित करणे आवश्यक आहे. तपासणी झाल्यानंतर लाभार्थी धान्य घेण्यास इच्छुक असल्यास त्यांच्या कागदपत्रांची पडताळणी करून, लाभार्थ्यांचे आधार सिडिंग करण्यासाठी अशा बाद शिधापत्रिकाधारकांना १४ फेब्रुवारीची मुदत देण्यात आली आहे. त्यानंतरच त्यांना धान्य उपलब्ध करून दिले जाणार आहे.

----------------

धान्याची उचल न केलेल्या शिधापत्रिका अपात्र, बोगस, अनिच्छुक असण्याची शक्यता असल्याने या शिधापत्रिका बाद करण्यात आल्या आहेत. धान्याची उचल न घेणाऱ्या शिधापत्रिका रद्द केल्याशिवाय नवीन पात्र लाभार्थ्यांची नोंदणी रेशन कार्ड मॅनेजमेंट सिस्टिम (आरसीएमएस)वर करता येत नाही. लाभ घेण्यास इच्छुक असलेल्यांची पडताळणी करून त्यांना पुन्हा उचित योजनेत वर्ग केले जाणार आहे.

-जयश्री माळी, जिल्हा पुरवठा अधिकारी, अहमदनगर

--------------

जिल्हानिहाय बाद झालेल्या शिधापत्रिका

अहमदनगर (१८२५४), अकोला (१५५०१), अमरावती (११८२१),परळ (२३६९६),औरंगाबाद (२२४१२),बीड (२१४०८) भंडारा (२५९४), बुलडाणा (१८१४३),चंद्रपूर (४७७८),धुळे (१४८३८), अंधेरी रिजन (३९१०६), वडाळा रिजन (८७१८२), ठाणे रिजन(११०५५५),गडचिरोली (४०५५), गोंदिया (३०७३), कांदिवली रिजन (३४४००), हिंगोली (६८०७), जळगाव (२८५४०), जालना (११४५७), कोल्हापूर (७७७५), लातूर (१६६४७),नागपूर ग्रामीण (८६५९), नागपूर शहर (११६७९), नांदेड (१८७४५), नंदुरबार (१५४८५), नाशिक (३६८३७), उस्मानाबाद (७९७५), पालघर (४२००४), परभणी (१५३५१), पुणे जिल्हा (८६४१), पुणे शहर (१०८६४), रायगड (१६२१३), रत्नागिरी (१५७७३), सांगली (५७४३), सातारा (५४०२), सिंधुदुर्ग (२४६२२), सोलापूर ग्रामीण (११३३१) सोलापूर शहर (१७९५), ठाणे ग्रामीण(५३५१), वर्धा (५९६३), वाशिम (५५८३), यवतमाळ (१८११०)

Web Title: Eight lakh ration cards in the state were rejected due to non-lifting of foodgrains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.