टंचाई कृती आराखड्यासाठी आठ कोटींची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 04:20 IST2020-12-22T04:20:29+5:302020-12-22T04:20:29+5:30
अहमदनगर : यंदा जिल्ह्यात मुबलक पाऊस होऊनही जिल्हा परिषदेने आठ कोटी अकरा लाख रुपयांचा टंचाई कृती आराखडा तयार केला ...

टंचाई कृती आराखड्यासाठी आठ कोटींची गरज
अहमदनगर : यंदा जिल्ह्यात मुबलक पाऊस होऊनही जिल्हा परिषदेने आठ कोटी अकरा लाख रुपयांचा टंचाई कृती आराखडा तयार केला असून तो मान्यतेसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविला आहे.
उन्हाळ्यातील टंचाईची स्थिती लक्षात घेता दरवर्षी जिल्हा परिषदेकडून ऑक्टोबर ते जून या कालावधीसाठी टंचाई कृती आराखडा तयार केला जातो. यामध्ये टँकर तसेच विविध पाणी उपलब्धतेच्या योजना तयार केल्या जातात व हा आराखडा नंतर जिल्हाधिकारी कार्यालयाकडे मंजुरीसाठी पाठविला जातो.
जिल्ह्यात यंदा २६१ गावे, तसेेेेच ८५३ वाड्यावस्त्यांवर पाणीटंचाईची शक्यता जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाकडून व्यक्त्त केेली जात आहे. या टंचाई कृती आराखड्यात ३७९ उपाययोजना सुचविण्यात आल्या असून त्यासाठी ८ कोटी ११ लाखांचा खर्च अपेक्षित आहे.
यंदाच्या आराखड्यात बुडक्या खोदण्यास तरतूद करण्यात आली नसून विहीर खोलीकरणाचा अवघा एक प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. खासगी विहीर अधिग्रहणाचे ८३ प्रस्ताव घेण्यात आले आहेत. चालूवर्षी मुबकल पावसानंतरही जिल्ह्यातील १३८ गावे आणि ६८६ गावांत सरकारी टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्याचे नियोजन आहे आणि त्यासाठी ६ कोटी ३५ लाखांची तरतूद केलेली आहे. साधारण मार्चनंतर जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. गतवर्षी पाणीपुरवठा विभागाने कमी पावसामुळे ५० कोटींचा टंचाई कृती आरखडा तयार केला होता.
.................
टंचाई कृती आराखड्यातील तरतुदी
विहीर खोलीकरण -१ गाव, ५ वाड्या आणि १ उपाययोजना २५ हजारांची तरतूद.
खासगी विहीर अधिग्रहण - ८३ गावे, १०२ वाड्या आणि १७२ उपाययोजनेसह ८६ लाख ४० हजारांची तरतूद.
बैलगाडीवरील टँकरद्वारे पाणीपुरवठा- १७ गावे, २ वाड्या आणि ३९ उपाययोजनेसह १७ लाखांची तरतूद.
टँकरद्वारे पाणीपुरवठा- १३८ गावे, ६८६ वाड्या आणि १३८ उपाययोजना ६ कोटी ३५ लाखांची तरतूद.
नळपाणी योजना विशेष दुरुस्ती - ५ गावे, २८ वाड्या आणि ६ उपाययोजना १६ लाखांची तरतूद.
नवीन बोअरवेल घेणे -६ वाड्या, ६ उपायोजना आणि ३ लाख ३० हजारांची तरतूद.
तात्पुरती पूरक पाणी योजना - ७ गावे, २४ वाड्या आणि १० उपायोजनेसह ५३ लाख रुपयांची तरतूद.