गीता आणि कुराण संवादाचे प्रभावी माध्यम : हनिफ खान शास्त्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2018 19:47 IST2018-02-22T19:44:28+5:302018-02-22T19:47:17+5:30
पाच हजार १५८ वर्षांपूर्वी भगवान श्रीकृष्णांच्या मुखातून गीता प्रकटली. त्यानंतर सुमारे साडेतीन हजार वर्षांनी कुराण जन्माला आले. आश्चर्याची बाब म्हणजे गीतेत सांगितले.

गीता आणि कुराण संवादाचे प्रभावी माध्यम : हनिफ खान शास्त्री
संगमनेर : पाच हजार १५८ वर्षांपूर्वी भगवान श्रीकृष्णांच्या मुखातून गीता प्रकटली. त्यानंतर सुमारे साडेतीन हजार वर्षांनी कुराण जन्माला आले. आश्चर्याची बाब म्हणजे गीतेत सांगितलेले तत्वज्ञान फक्त वेगळ्या लिपीत आणि भाषेत कुराणात सांगितले आहे. हे दोन्ही महान धार्मिक ग्रंथ म्हणजे वादाचे नव्हे तर संवादाचे प्रभावी माध्यम आहेत, असे प्रतिपादन संस्कृत भाषेचे गाढे अभ्यासक डॉ. मोहम्मद हनीफ खान शास्त्री यांनी केले.
गीता परिवाराच्या वतीने भंडारी मंगल कार्यालयात गीतेतील वैश्विक विचार या विषयावर बुधवारी डॉ. खान यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी हे विचार सप्रमाण मांडले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. भगवान जोशी तर व्यासपीठावर गीता परिवाराचे कार्याध्यक्ष डॉ. संजय मालपाणी, संगमनेर शाखाप्रमुख सतीश इटप उपस्थित होते.
डॉ. खान म्हणाले, गीता आणि कुराण यांची केवळ लिपी भिन्न आहे. बारकाईने अभ्यास केला तर दोन्हींचा गाभा एकच आहे. दोन्ही ग्रंथ सद्भावना, बंधुत्व आणि मानवतेचा पुरस्कार करणारे आहेत. द्वेषभावनेचा जराही लवलेश या महान ग्रंथांमध्ये नाही. डॉ. खान यांनी वेद, गीता, कुराण, अरण्यके, उपनिषदे यातील दाखले देत या सर्वांची शिकवण मानवतेच्या मुल्यांचा पुरस्कार करणारी असून त्यात तिरस्काराला तसूभरही वाव नाही असे सांगीतले. राजकीय लाभासाठी आणि दोन समुदाय परस्परांशी झुंजविण्यासाठी आजवर त्यांचा दुरुपयोग होत आला. ही दुदैर्वाची गोष्ट असुन गीता ही अखिल विश्वातील मानवजातीला भारताने दिलेली सर्वोत्तम भेट आहे असल्याचे डॉ. खान म्हणाले.
मुस्लीम समाजाच्या वतीने जुबेर इनामदार, डॉ. जी. पी. शेख, साजिद पठाण यांनी डॉ. खान यांचा सत्कार केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गिरीश डागा व अभिजित गाडेकर यांनी केले. सतीश इटप यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी दत्ता भांदुर्गे यांनी विशेष परिश्रम घेतले. संगमनेरातील सर्वधर्मीय नागरिकांनी हे व्याखान ऐकण्यासाठी मोठी गर्दी केली होती.