रानभाज्या खा अन् निरोगी रहा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:25 IST2021-08-12T04:25:41+5:302021-08-12T04:25:41+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क अकोले : पावसाळ्यात रानात शिंदळमाकड, कोळू, तांदुचा, चाई कोंब या रानभाज्या उगवणाऱ्या शक्तीवर्धक, आरोग्यवर्धक असून, सध्या ...

Eat legumes and stay healthy | रानभाज्या खा अन् निरोगी रहा

रानभाज्या खा अन् निरोगी रहा

लोकमत न्यूज नेटवर्क

अकोले : पावसाळ्यात रानात शिंदळमाकड, कोळू, तांदुचा, चाई कोंब या रानभाज्या उगवणाऱ्या शक्तीवर्धक, आरोग्यवर्धक असून, सध्या या भाज्या बाजारात विक्रीसाठी येत आहेत. मात्र, कुर्डू, बडदा, भारंबी, चिभूट, आंबटवेल या रानभाज्या दुर्मीळ होत चालल्या आहेत.

मानवी आरोग्यास हितकारक असलेल्या शिंदळमाकड, कोळू, चाई, करटुलं, तांदुळचा या रानभाज्या जंगलातून काढून आणून विठा घाट तसेच अकोले बाजारतळाच्या जवळपास रस्त्याच्या कडेला बसून आदिवासी विकताना दिसत आहेत.

या रानभाज्यात कार्बोहायड्रेट्स व अँटिऑक्सिडन्ट म्हणून त्या काम करतात. शिंदळमाकड व काटेरी करटुले या रानभाज्या कारल्यासारख्या चवीला कडू असतात. मात्र, या भाज्या पित्तनाशक आहेत. या भाज्या खाल्ल्याने पित्तामुळे होणारी जळजळ, करपट ढेकर आदी विकार कमी होऊन पचनशक्ती वाढते. पोटाचे विकार दूर होतात.

अकोले तालुक्यातील निसर्गात म्हैसवेल, हादगा, चंदनबटवा, आंबटवेल, भोकर, सुरण, कुर्डू, काटेमाठ, हिरवा व लालमाठ, आंबाडी, गुळवेल, चाई बोंडे, भूई-आवळी, बांबुचा कोंब, रानओवा, आंबटचुका, तेहडा, फांदभाजी, रानतोंडली, कोंदुरसा, रानआळू, कडू शेरणी, कडू वाळुक अशा आरोग्यवर्धक भाज्या मिळून येतात.

रानभाज्यांचे महत्व आणि त्या तयार करण्याची रेसिपी याचा अधिक प्रचार झाल्यास आरोग्यवर्धक पिढी होण्यास मदत होईल आणि आदिवासींना आर्थिक उत्पादनाचा श्रोत उपलब्ध होईल. अनेकदा रानभाजी बाजारात विक्रीसाठी येते. पण, काहींना या भाज्यांची माहिती नसते, म्हणून ते विकत घेत नाहीत. अनेकदा आदिवासी भाजी विक्रेत्यांनाही या भाज्यांचे महत्व लोकांना समजावून सांगता येत नाही. त्यामुळे कृषी विभाग, आदिवासी विकास विभाग यांनी रानभाज्यांचा प्रचार व प्रसारासाठी विशेष मोहीम हाती घेण्याची गरज आहे. यातून आरोग्यवर्धक पिढ्या तयार होण्यास मदत होणार आहे, असे या भाज्यांचे जाणकार सांगतात.

......................

आंबटवेल, बडदा, भारंबी, चिभूट या रानभाज्या कमी होत चालल्या आहे. गुळवेल, कडमडवेल, रानओवा या औषधी गुणधर्म असलेल्या भाज्या जंगल-रानात टिकून आहेत. वन विभागाने या रानभाज्यांच्या माहितीचे फलक बाजारतळावर लावल्यास आदिवासींच्या कष्टाचे चीज होईल आणि रानभाज्या प्रकाशझोतात येतील, असे वाटते.

-रामलाल हासे, रानभाज्यांचे अभ्यासक

.............

झीज भरून काढण्यासाठी गुणकारी

चाई दाट जंगलात मिळते, तर शिंदळमाकड आवर्षण परिसरातील टेकड्यांच्या पोटाला खडक माळरानावर वाढतात. कॅक्टस कांडी ही सांबरसारखी रानभाजी आहे. डोंगर उतारावर ही भाजी आढळते. या रानभाज्या या शरीरातील विषद्रव्याचा नाश करतात आणि झीज वेगाने भरून काढतात. नव्या पेशींच्या निर्मितीचा वेग वाढवतात.

...............

हाडांच्या मजबुतीसाठी करटुले

पानथळ जागी कोळू आढळून येते. कांद्याच्या पातीसारखी ही भाजी असून, लोक आवडीने विकत घेतात. 'करटुले' ही कारल्यासारखी कडू भाजी असली तरी हाडे मजबूत होण्यास मदत होते.

...............

कंबर दुखीवर सराटे गुणकारी

चिभूट हे हरभरा वा शेंगदाण्याएवढे वांगे फळ असून, ही रानभाजी शक्तीवर्धक आहे. सराटेची भाजी कंबरदुखीवर गुणकारी असते.

Web Title: Eat legumes and stay healthy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.