घारगावमध्ये भूकंप सदृश्य धक्के, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2018 13:08 IST2018-08-21T13:06:55+5:302018-08-21T13:08:17+5:30
संगमनेर तालुक्यातील घारगावसह लगतच्या काही गावांमध्ये मंगळवारी सकाळी साडे आठच्या सुमारास पुन्हा एकदा भूगर्भातील हालचालींचे दोन धक्के जाणवले.

घारगावमध्ये भूकंप सदृश्य धक्के, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
घारगाव (संगमनेर,जि. अहमदनगर) : संगमनेर तालुक्यातील घारगावसह लगतच्या काही गावांमध्ये मंगळवारी (21 ऑगस्ट) सकाळी साडे आठच्या सुमारास पुन्हा एकदा भूगर्भातील हालचालींचे दोन धक्के जाणवले. यातील एका धक्क्याची तीव्रता अधिक होती.
दोन दिवसांपूर्वी शनिवारी रात्री साडे दहाच्या सुमारासही घारगाव व परिसरातील काही गावांमध्ये भूगर्भातील हालचालींचे सौम्य धक्के जाणवले होते. या धक्क्यांची कोणत्याही प्रकारची नोंद नाशिकच्या भूकंपमापन यंत्रावर झाली नव्हती. दरम्यान, मंगळवारी सकाळी पुन्हा साडे आठ वाजल्यानंतर ठराविक वेळेच्या अंतराने दोन धक्के घारगाव, आंबी खालसा, नांदूर खंदरमाळ, अकलापूर, कोठे, माळेगाव पठार, तांगडी, जांबुत या गावांमध्ये जाणवले.
दोन धक्क्यांपैकी एक धक्क्याची तीव्रता अधिक असल्याचे आंबी खालसा गावचे उपसरपंच सुरेश कान्होरे, भूषण भोर, राजेश तांगडकर, मंगेश कान्होरे, प्रशांत कान्होरे, नितीन वाकळे, अविनाश भोर, वाल्मिक आहेर यांनी सांगितले. धक्क्यांमुळे ग्रामस्थांमध्ये घबराट निर्माण होऊन ते घरांच्या बाहेर पडले होते.
शनिवारीही धक्के जाणवले होते परंतु याची नोंद झाली नव्हती. आज पुन्हा साडे आठच्या सुमारास तीव्र धक्के जाणवले. नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले असून याचे गूढ नक्की काय आहे. याची माहिती भूगर्भ शास्त्रज्ञानी इथे येऊन घ्यावी.
- सुरेश कान्होरे, उपसरपंच आंबी खालसा