भुयारीने उडविला शहरभर धुराळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 04:16 IST2020-12-26T04:16:53+5:302020-12-26T04:16:53+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क अण्णा नवथर अहमदनगर : शहरातील रस्ते खोदून ठेकेदाराने पाईप टाकले, पण पाईप टाकलेली जागा नीटनेटकी केली ...

भुयारीने उडविला शहरभर धुराळा
लोकमत न्यूज नेटवर्क
अण्णा नवथर
अहमदनगर : शहरातील रस्ते खोदून ठेकेदाराने पाईप टाकले, पण पाईप टाकलेली जागा नीटनेटकी केली नाही. रस्त्यावर पडलेले मातीचे ढीग, दगडगोटे जागेवरच पडून आहेत. त्यामुळे रस्ते खडबडीत झाले आहेत. मातीमुळे सर्वत्र धूळ झाली आहे. धुळीमुळे आमचे व्यवसाय तर बुडाले. सर्दी, खोकल्याचा त्रास होऊ लागला आहे. आता हे निस्तरणार कोण, असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
अमृत भुयारी गटार योजनेतंर्गत शहरात भूमिगत पाईप टाकण्याचे काम सुरू आहे. जिल्हाधिकारी कार्यालये ते जुने मनपा कार्यालय, माळीवाडा, हतमपुरा, डावरे गल्ली, घासगल्ली, अशा टॉकीज चौक आदी भागांतील रस्ते पाईप टाकण्यासाठी खोदण्यात आले आहेत. पाईपच्या आकाराचे चर ठिकठिकाणी खोदले. हे चर रस्त्यात जिथे जागा मिळेल, तिथे खोदण्यात आले. यावर कळस असा की, अशा टॉकीज चौकात तर रस्त्याच्या मध्यभागी चर खोदण्यात आला. हा रस्ता पूर्वी सुस्थितीत होता. माती उडत नव्हती. मात्र, पाईप टाकल्यानंतर रस्त्याच्या मध्यभागी मातीचे ढीग साचलेले आहेत. मातीवर भलेमोठ्ठे दगड अस्ताव्यस्त पडलेले आहेत. हे दगड वाहतुकीसाठी अडथळा ठरत आहेत. दगड चुकविताना अपघात होत असून चारचाकी चालविणे कठीण झाले आहे. माती रस्त्यावर पसरलेली आहे. वाहनांमुळे धूळ उडते. वाहनांची सतत ये- जा असल्याने दिवसभर फुफाटा उडतो. त्यामुळे सर्दी खोकल्याचा त्रास्त होतो. धुळीपासून सरंक्षण व्हावे, यासाठी काही दुकानदारांनी प्लास्टिकचे पडदे लावलेले पाहायला मिळाले. धुळी पाहून ग्राहक दुकानात येत नाहीत. आधीच कोरानामुळे सहा महिने व्यवसाय बंद होते. दिवाळीनंतर कसेबसे दुकाने सुरू केले. त्यात रस्ते खोदून ठेवले. काम करायचे तर रस्ता खोदावाच लागेल, हे आम्हालीही मान्य आहे. पण काम झाल्यानंतर रस्ते व्यवस्थित करायला नको का. पाईप टाकलेली जागा सपाट केली असती तरी हा प्रश्न निर्माण झाला नसता. पण, हे करणार कोण, अशा संतप्त प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त केल्या जात आहेत.
...
रस्ते दुरुस्तीला ठेकेदाराकडून टाळाटाळ
भुयारी गटार योजनेसाठी रस्ता खोदल्यानंतर तो पुन्हा दुरुस्त करून देण्याची जबाबदारी ठेकेदाराची आहे. तशी अटही निविदेत आहे. पाईप टाकून झाल्यानंतर त्यावर बांध घातलेले अनेक ठिकाणी पहायला मिळाले. कापड बाजारातून माणिक चौकाकडे जाणारा रस्ता खोदल्यामुळे तो खाली-वर झाला आहे. या रस्त्यावरून दुचाकी चालविणे कठीण झाले. वाहने घसरून अपघात होत असून, अपघातात बळी गेल्यानंतरच महापालिकेला जाग येणार का, असा प्रश्न व्यावयायिकांकडून उपस्थित केला जात आहे.
...
- स्टेट बँक चौक ते जुनी महापालिका रस्ता खोदून ठेवला होता. पाईप टाकून रस्ता बुजविला, पण माती तशीच आहे. ती उचलून घेतली नाही. त्यामुळे धूळ उडत असून, या धुळीमुळे व्यावसायिकांना त्रास होत आहे. कोरोनापेक्षाही धूळ धोकादायक आहे.
- इब्राहिम शेख, व्यावसायिक
...
- आशा टॉकीज चौकातील रस्ता पाईप टाकण्यासाठी खोदला आहे. पाईप टाकून झाल्यानंतर व्यवस्थित बुजविले नाही. त्यामुळे चौकात मोठ्या प्रमाणात धूळ उडते. धुळीने सर्दी, खोकल्याचा त्रास होत असल्याने दुकानासमोर प्लास्टिक लावले आहे.
- जावेद सय्यद, व्यावसायिक
...
- आठ- दहा दिवसांपासून रस्ता खोदून ठेवला आहे. पाईप टाकून झाल्यानंतर रस्ता सपाट केला नाही. दगडगोटे मोकळे झाल्याने अपघात होत असून, धूळ उडत आहे. दुकाने दिवसांतून दोनवेळा स्वच्छ करावे लागत आहेत.
- टी. मुलताणी, दुकानदार
....
- घासगल्लीत फेज-२ ची पाईपलाईन टाकली. त्यामुळे नळजोड तुटले. पाणी रस्त्यावर साचले आहे. यामुळे दुचाकी चालविणे कठीण झाले आहे. वेळोवेळी संपर्क करूनही ठेकेदार नळ जोडण्यासाठी येत नाहीत.
- अजिम राजे,
....
पाण्याच्या लाईनवर चेम्बर
भुयारी गटार व फेज-२ च्या पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू आहे. हतमपुरा भागात पाण्याच्या लाईनवरच भुयारी गटार योजनेचे चेम्बर बांधल्याचे नागिरकांकडून सांगण्यात आले.