हजार रुपयांची लाच घेताना ‘डमी तलाठ्या’ला पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 04:20 IST2021-03-19T04:20:20+5:302021-03-19T04:20:20+5:30
सचिन सुरेश क्षीरसागर (वय ३५, रा. मिरजगाव) असे आरोपीचे नाव असून, गुरुवारी ही कारवाई करण्यात आली. तक्रारदाराच्या वडिलोपार्जित शेतीचे ...

हजार रुपयांची लाच घेताना ‘डमी तलाठ्या’ला पकडले
सचिन सुरेश क्षीरसागर (वय ३५, रा. मिरजगाव) असे आरोपीचे नाव असून, गुरुवारी ही कारवाई करण्यात आली.
तक्रारदाराच्या वडिलोपार्जित शेतीचे वाटणीपत्र करून त्याआधारे फेरफार नोंद करून उतारा मिळण्यासाठी घुमरी - कोकणगाव (ता. कर्जत) येथील तलाठी कार्यालयात तक्रारदाराने अर्ज केला होता. त्या कामासाठी तलाठी कार्यालयात मदतनीस म्हणून काम करणाऱ्या सचिन क्षीरसागर याने एक हजार रुपयांची मागणी केली. त्यामुळे तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे याची तक्रारी केली. पथकाने १५ मार्च रोजी केलेल्या लाच मागणी पडताळणीमध्ये आरोपी क्षीरसागर याने पंचांसमक्ष एक हजार रुपये लाचेची मागणी केली. त्यानुसार आरोपीने १८ मार्च रोजी ही रक्कम तक्रारदाराकडून स्वीकारली. त्याच वेळी पथकाने त्यास अटक केली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक सुनील कडासने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक हरीश खेडकर, पोलीस निरीक्षक शाम पवरे, नाईक रमेश चौधरी, विजय गंगुल, रवींद्र निमसे, वैभव पांढरे, राधा खेमनर, संध्या म्हस्के, हरुन शेख यांनी ही कारवाई केली.
------------
ग्रामीण भागात महसुली कामे करताना तलाठी आणि त्यांचे खासगी पंटर यांच्याकडून सामान्य माणसाला वेठीस धरले जाते. यातूनच सामान्य जनतेची आर्थिक पिळवणूक केली जाते. खासगी पंटरआडून हे व्यवहार होत असले तरी यास तलाठी जबाबदार आहेत. याप्रकरणी चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी.
- प्रवीण अनभुले, सामाजिक कार्यकर्ते