आधुनिकतेमुळे गोदावरी दूध संघाचा राज्यात लौकिक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:26 IST2021-04-30T04:26:01+5:302021-04-30T04:26:01+5:30
कोपरगाव : आधुनिकतेला प्राधान्य देत असल्याने गोदावरी दूध संघाने राज्यात लौकिक प्राप्त केला असल्याचे गौरवोद्गार शिर्डी लोकसभेचे खासदार सदाशिव ...

आधुनिकतेमुळे गोदावरी दूध संघाचा राज्यात लौकिक
कोपरगाव : आधुनिकतेला प्राधान्य देत असल्याने गोदावरी दूध संघाने राज्यात लौकिक प्राप्त केला असल्याचे गौरवोद्गार शिर्डी लोकसभेचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी काढले.
कोपरगाव येथील गोदावरी खोरे नामदेवरावजी परजणे पाटील तालुका सहकारी दूध उत्पादक संघास भारत सरकारच्या पशुपालन व दुग्ध व्यवसाय विभागाच्या राष्ट्रीय दुग्धविकास योजना २०२० -
२०२१ अंतर्गत व महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघ, मुंबई यांच्या माध्यमातून प्राप्त झालेल्या मिल्को स्कॅन एफटी - १ या यंत्रसामग्रीचे उद्घाटन तसेच संघाचे संस्थापक नामदेवराव परजणे पाटील (आण्णा) यांच्या नूतनीकरण केलेल्या स्मृतिस्थळाचे उद्घाटन खासदार डॉ. सुजय विखे व खासदार सदाशिव लोखंडे यांच्या हस्ते गुरुवारी (दि. २९) करण्यात आले. त्याप्रसंगी खासदार लोखंडे बोलत होते. प्रारंभी संघाचे अध्यक्ष राजेश परजणे यांनी स्वागत केले.
विखे म्हणाले, नामदेवराव परजणे अण्णा यांच्या प्रेरणेतून संघाच्या कार्यक्षेत्रात धवलक्रांतीचा उदय झालेला आहे. आधुनिकतेची कास धरून संघाने प्रगतीचा आलेख उंचावत नेलेला आहे. कार्यक्षेत्रातील हजारो कुटुंबांना या व्यवसायाच्या माध्यमातून आर्थिक हातभार लागलेला आहे. शेतीला पूरक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या व्यवसायाने सर्वसामान्य, गोरगरीब शेतकऱ्यांना उन्नतीचा मार्ग सापडला आहे.
राजेश परजणे म्हणाले, संघात नव्याने कार्यरत झालेल्या मिल्को स्कॅन एफटी - १ या अत्याधुनिक मशिनरीमुळे दुधातील स्निग्धांश, स्निग्धांशतेतर घटक, प्रोटिन, लॅक्टोज, ग्लुकोज, केसिन, डेनसिटी, लॅक्टीक, ॲसिड, युरिया, सायट्रीक ॲसिड, फ्रीजिंग पॉईंट, सेल्सियस, ॲसेडिटी आदींच्या तपासण्या करण्यास मदत होणार असल्याने कामकाजात यामुळे गती येणार आहे. शिवाय एका मिनिटातच रिझल्ट देण्याची क्षमतादेखील या यंत्रामध्ये आहे. यावेळी संघाचे कार्यकारी संचालक चंद्रकांत गाढवे यांनी आभार मानले. कार्यक्रमास अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. कोरोना काळातील सर्व नियमांचे पालन करून कार्यक्रम पार पडला.