‘महिलाराज’ संपुष्टात!

By Admin | Updated: July 29, 2014 01:04 IST2014-07-28T23:27:45+5:302014-07-29T01:04:31+5:30

अहमदनगर: गेल्या तीन खेपांपासून नगर पंचायत समितीत सुरु असलेले ‘महिलाराज’ आजच्या सोडतीमुळे संपुष्टात आल्यात जमा आहे.

Due to 'Mahilaraj'! | ‘महिलाराज’ संपुष्टात!

‘महिलाराज’ संपुष्टात!

अहमदनगर: गेल्या तीन खेपांपासून नगर पंचायत समितीत सुरु असलेले ‘महिलाराज’ आजच्या सोडतीमुळे संपुष्टात आल्यात जमा आहे. यावेळी नागरिकांचा मागासप्रवर्ग सभापतीपदासाठी आरक्षित झाल्याने साडेसात वर्षांच्या अवधीनंतर नगरच्या सभापतीपदाची माळ एखाद्या पुरुष सदस्याच्या गळ्यात पडण्याच्या आशा पल्लवित झाल्याने आजची सोडत पुरुष सदस्यांसाठी ‘गुडन्यूज’ ठरल्याची चर्चा आहे.
नगर पंचायत समितीत शिवसेना-भाजपची सत्ता आहे. यात सेनेचे ४, भाजपचे ३, काँग्रेसचे ३ व राष्ट्रवादीच्या २ सदस्यांचा समावेश आहे. सध्या अस्तित्वात असलेले सभापतीपदाचे आरक्षण (अनुसूचित जाती महिला) ४ पक्षांपैकी केवळ सेनेकडेच होते. यामुळे सेनेच्या सुनीता नेटके सभापती तर भाजपचे शरद झोडगे उपसभापती झाले होते. नगर पंचायत समितीत गेल्या साडेसात वर्षांपासून सभापतीपदावर ‘महिलाराज’चेच राज्य होते. मात्र, काहींची कारकीर्द वादग्रस्त ठरली. राज्यभर नगर पंचायत समितीच्या कारभाराची बोंबाबोंब झाली. यामुळे पंचायत समितीमधील अधिकारी व कर्मचारी तसेच कामे घेऊन येणारे नागरिकही ‘महिलाराज’वर नाराज होते. यावेळी ओबीसी पुरुष असे सभापतीपदासाठी आरक्षण जाहीर झाल्याने सत्ताधारी युतीच्या गटातील पुरुष सदस्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
सभापतीपदासाठी शिवसेना-भाजपमध्ये अडीच-अडीच वर्षे असे कुठेलच समीकरण ठरले नसल्याचे शिवसेनेच्यावतीने अधिकृतपणे सांगण्यात आले. यामुळे यावेळीही सेनेचाही सभापतीपदावर दावा कायम असल्याची चर्चा सुरु झाली आहे. नगर तालुक्यात युती व राष्ट्रवादीचे सूर ‘बेसूर’ झाल्याने युतीची नेतेमंडळी काँग्रेसबरोबर ‘सूर’ जुळवून घेऊन त्यांच्या तीनही महिला सदस्यांना सत्तेत सामावून घेण्याच्या हालचालीत आहेत. राष्ट्रवादीला बाजूला सारत ही युती होण्याची चर्चा कार्यकर्ते करीत आहेत. सभापती सेनेचा की भाजपचा याचा निर्णय आ. शिवाजी कर्डिले व सेनेचे जिल्हाप्रमुख प्रा. शशिकांत गाडे हेच घेणार असल्याने सेनेकडून व भाजपकडून वेगवेगळ्या ‘पुरुष’ सदस्यांचा आग्रह कार्यकर्ते धरत आहेत.
नगर तालुक्यात नंदा शेंडगे, नलिनी पाखरे, सुनीता नेटके या तिनही महिला एकामागून एक झाल्या. यामुळे काहींचा कारभार यजमानांनी तर काहींचा कुटुंबीयांनी सांभाळला. विकासकामांत अडथळे येऊ लागल्यानंतर आता ‘कणखर’ नेतृत्व असलेला सभापती हवा, असा आग्रह सुरू झाला आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Due to 'Mahilaraj'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.