चालक-वाहकांच्या तोंडाला मास्क; प्रवासी विनामास्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:15 IST2021-06-24T04:15:41+5:302021-06-24T04:15:41+5:30

संगमनेर : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, याकरिता विनाकारण घराबाहेर पडू नका, बाहेर पडल्यास तोंडाला मास्क लावा. शारीरिक अंतराचे नियम ...

Driver-carrier mouth mask; Migrants without masks | चालक-वाहकांच्या तोंडाला मास्क; प्रवासी विनामास्क

चालक-वाहकांच्या तोंडाला मास्क; प्रवासी विनामास्क

संगमनेर : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, याकरिता विनाकारण घराबाहेर पडू नका, बाहेर पडल्यास तोंडाला मास्क लावा. शारीरिक अंतराचे नियम पाळा, हात स्वच्छ धुवा, असे आवाहन प्रशासनाकडून वारंवार करण्यात येत आहे. असे असतानादेखील महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसेसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून नियमांचे उल्लंघन होताना दिसत आहे. एकीकडे बसचे चालक- वाहक हे तोंडाला मास्क लावत असताना दुसरीकडे प्रवासी मात्र, विनामास्क बसमध्ये बसल्याचे रिॲलिटी चेकच्या माध्यमातून समोर आले आहे.

कोरोनाच्या पहिल्या लाटेत लॉकडाऊन करण्यात आला होता. दुसऱ्या लाटेत ‘ब्रेक द चेन’च्या माध्यमातून कडक निर्बंध घातले गेले. लॉकडाऊन काळात महामंडळाच्या बसेस बंद होत्या, तर दुसऱ्या लाटेत केवळ अत्यावश्यक सेवेतील नागरिकांना बसमधून प्रवास करता येत होता. निर्बंध शिथिल केल्यानंतर महामंडळाची बससेवा सुरू झाली. अनेक आगाराच्या बसेस संगमनेरात येत आहेत, तसेच संगमनेर बसस्थानकातूनदेखील काही बसेसच्या फेऱ्या नियमित होत आहेत.

बुधवारी (दि.२३) दुपारी १२.४७ वाजेच्या सुमारास संगमनेर बसस्थानकात काही बसेस उभ्या होत्या. अकोले आगाराच्या ठाणे- कल्याण- आळेफाटा-संगमनेर- अकोले या बसमध्ये (एमएच-१४, बीटी-३२१७) अकोलेकडे जाण्यासाठी बसलेल्या अनेक प्रवाशांचा मास्क हनुवटीवर होता, तर काही प्रवाशांनी योग्य पद्धतीने मास्क लावलेले होते. अहमदनगरला जाणाऱ्या बसमध्ये (एमएम-१४, बीटी-४२११) बसलेल्या काही महिलांनी व युवकांनी योग्य पद्धतीने तोंडाला मास्क लावलेले होते. बसमध्ये मागील सीटवर बसलेला एक युवक मोबाइलमध्ये गुंग होता. त्याच्या तोंडाला मास्क नव्हता. वाहकाच्या मागील सीटवर बसलेली एक व्यक्ती विनामास्क बिनधास्त बसून फोनवर बोलत होती. या बसमध्ये बसलेल्या बऱ्याच प्रवाशांचे मास्क नाकाखाली आलेले होते.

संगमनेर आगाराच्या संगमनेर- पुणे या बसचे (एमएच-१३, सीयू-६६६३) चालक बसमध्ये, तर वाहक खाली उभे होते. त्या दोघांनीही तोंडाला मास्क लावलेला होता. मात्र, या बसमध्ये बसलेल्या काही महिला व पुरुष प्रवाशांच्या तोंडाला मास्क नव्हता. लोकमत प्रतिनिधीने बसमध्ये चढून फोटो घेतल्यानंतर अनेकांनी हनुवटीवर असलेले आपले मास्क व्यवस्थित तोंडाला लावले.

-------------

चालक-वाहक घेतात काळजी

संगमनेर बसस्थानकात बसेसमध्ये प्रवासी चढत असताना बसेस चालक-वाहक हे बसेसजवळ उभे होते. त्यांनी मास्क लावलेला होता. काहींनी काळजी म्हणून तोंडाला लावलेल्या मास्कवर रुमाल बांधला होता. प्रवासादरम्यान आम्ही काळजी घेत असल्याचे त्यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

--------------

चालक-वाहकांनी कर्तव्यावर असताना मास्क लावावा, अशा सूचना संगमनेर आगारातील सर्वच चालक-वाहकांना दिलेल्या आहेत. प्रवासी विनामास्क बसमध्ये चढत असतील, तर त्यांना बसमध्ये घेऊ नका, अशी सूचना चालक- वाहकांना दिली आहे.

-नीलेश करंजकर, आगारप्रमुख, संगमनेर आगार

......................

त्यामुळे थोडा वेळ मास्क खाली

प्रत्येक बसस्थानकात, थांब्यांवर बसमध्ये बसणाऱ्या प्रवाशांना तोंडाला मास्क लावा, असे सांगतो. तिकीट काढायला जातो तेव्हा प्रवाशांनी मास्क लावलेला असतो. मात्र, त्यानंतर काही प्रवासी मास्क हनुवटीवर घेतात. त्यांना मास्क लावा, असे सांगितले असता गुदमरल्यासारखे होत असल्याने थोडा वेळ मास्क खाली घेतल्याचे ते सांगतात, असेही काही वाहकांनी सांगितले.

..............

फोटो नेम : २३ बसमधील फोटो, ओळ : संगमनेर-पुणे बसमधील फोटो.

Web Title: Driver-carrier mouth mask; Migrants without masks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.