गरिबांचे पक्क्या घराचे स्वप्न लटकले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:15 IST2021-07-21T04:15:47+5:302021-07-21T04:15:47+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क अहमदनगर : महापालिकेने पंतप्रधान आवास योजनेंतर्गत शहरात गृहप्रकल्पांचे काम सुरू केले. मात्र केंद्र शासनाकडून अनुदान मिळाले ...

गरिबांचे पक्क्या घराचे स्वप्न लटकले
लोकमत न्यूज नेटवर्क
अहमदनगर : महापालिकेने पंतप्रधान आवास योजनेंतर्गत शहरात गृहप्रकल्पांचे काम सुरू केले. मात्र केंद्र शासनाकडून अनुदान मिळाले नाही. तसेच कोरोनाच्या संकटामुळे लाभार्थींना स्वहिस्सा भरणे अशक्य झाले आहे. त्यामुळे नगर शहरातील ११३८ घरांचा प्रकल्प ठप्प आहे.
सर्वांसाठी घरे देण्यासाठी केंद्र सरकारने पंतप्रधान आवास योजना सुरू केली. केेंद्र सरकारकडून प्रति लाभार्थी २ लाख ५० हजार रुपये अनुदान मिळणार होते. त्यानुसार महापालिकेने केंद्र सरकारला प्रस्ताव सादर केला. त्यास मंजुरीही मिळाली. महापालिकेने केडगाव येथे ६२४, काटवन खंडोबा येथे २१६ आणि संजयनगरमध्ये २९८ घरांचा प्रकल्प हाती घेतला. लाभार्थींची निवड करण्यासाठी सोडत काढली. परंतु, प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे महापालिकेने ही घरे सर्वांसाठी खुली केली. केडगाव येथील घरांसाठी ८ लाख ९३ हजार, तर काटवनखंडोबा येथील घरांसाठी ९ लाख ९१ हजार रुपये इतकी किंमत निश्चित केली. यापैकी २ लाख ५० हजार रुपये अनुदान मिळणार आहे. त्यामुळे ही रक्कम वजा करून उर्वरित रक्कम लाभार्थींनी भरणे अपेक्षित आहे. असे असले तरी शासकीय अनुदान वगळता उर्वरित रक्कम भरण्याची तयारी लाभार्थींनी दाखविली नाही. शासकीय अनुदानच मिळाले नसल्याने केडगाव व काटवन खंडोबा येथील गृहप्रकल्पाचे सुरू झालेले काम थांबले आहे. याशिवाय संजयनगर येथील २९८ घरांसाठी अमेरिकेतील सामाजिक संस्थेने अर्थसाहाय्य केले आहे. या घरांसाठी पालिकेने ४ लाख ८५ हजार इतकी किंमत निश्चित केली आहे. यापैकी २ लाख ५० हजार रुपये अनुदान स्वरूपात मिळणार आहेत. तसेच सामाजिक संस्थेकडून १ लाख ३५ हजार रुपये देण्यात येत असून, लाभार्थींना प्रत्येकी १ लाख रुपये भरावे लागणार आहेत. ही रक्कम कमी असल्याने संजयनगर येथील गृहप्रकल्पाचे काम सुरू आहे. उर्वरित केडगाव, काटवनखंडोबा येथील गृहप्रकल्पाचे काम ठप्प झाले आहे.
....
शहरातील मंजूर गृहप्रकल्प
केडगाव- ६२४
काटवनखंडोबा- २१६
संजयनगर- २९८
...
वैयक्तिक घरे
४०३
....
शासकीय अनुदानाची प्रतीक्षा
पंतप्रधान आवास योजनेचे यंदाचे अखेरचे वर्ष आहे. सन २०१८ मध्ये नगर शहरात ११३८ घरे मंजूर झाली. शासनाकडून २ लाख ५० हजार रुपये आनुदान मिळणार असले तरी प्रत्यक्षात घरांची किंमत त्याहीपेक्षा अधिक आहे. दोन वर्षे उलटूनही शासकीय अनुदान मिळालेले नाही. लाभार्थी अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत.
....
लॉकडाऊनमुळे अर्थिक नियोजन कोलमडले
शासनाकडून घरांसाठी २ लाख ५० हजार रुपयांचे अनुदान मिळणार आहे. परंतु, साहित्य महागल्याने या घरांच्या किमतीदेखील वाढल्या आहेत. त्यामुळे पालिकेने ही घरे सर्वांसाठी खुली केली. उर्वरित रक्कम भरण्यासाठी बँकांशीही संपर्क केला. परंतु, लॉकडाऊनमुळे सर्वसामान्यांचे अर्थिक नियोजन पूर्णपणे कोलमडले. हाताला काम राहिले नाही. त्यामुळे शा परिस्थितीत स्वहिस्सा कसा भरणार, असा प्रश्न लाभार्थींकडून उपस्थित केला जात आहे.
....
अशा आहेत घरांच्या किमती
केडगाव- ८ लाख ९३ हजार
काटवनखंडोबा- ९ लाख ९१ हजार
संजयनगर- ४ लाख ८५ हजार
....
- पंतप्रधान आवास योजनेंतील घरांसाठी शासनाकडून मिळणारे अनुदान अद्याप मिळालेले नाही. लॉकडाऊनमुळे स्वहिस्सा भरणे लाभार्थींना अशक्य आहे. लाभार्थींकडून प्रतिसाद मिळत नसल्याने केडगाव व काटवनखंडोबा येथील प्रकल्प ठप्प आहेत. एकमेव संजयनगर येथील प्रकल्पाचे काम सुरू आहे. या प्रकल्पासाठी अमेरिकेतील सामाजिक संस्थेकडून अर्थसाहाय्य केले जात असल्याने लाभार्थींना मोठा दिलासा मिळाला आहे.
- आर.जी. मेहत्रे, प्रकल्प प्रमुख
..
फोटो: २० संजयनगर नावाने आहे.