ड्रॅगन फ्रूटमधून मिळतेय एकरी तीन लाखांचे उत्पन्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:15 IST2021-07-19T04:15:02+5:302021-07-19T04:15:02+5:30
जवळे : पारनेर तालुक्यातील राळेगण थेरपाळ येथील शेतकऱ्याने पारंपरिक शेतीला फाटा देत ड्रॅगन फ्रूटची शेतकी पिकवरून एकरी वार्षिक तीन ...

ड्रॅगन फ्रूटमधून मिळतेय एकरी तीन लाखांचे उत्पन्न
जवळे : पारनेर तालुक्यातील राळेगण थेरपाळ येथील शेतकऱ्याने पारंपरिक शेतीला फाटा देत ड्रॅगन फ्रूटची शेतकी पिकवरून एकरी वार्षिक तीन लाखांचे उत्पन्न मिळवित आहेत. त्यांनी आंतरपीक पद्धतीचाही नवा आदर्श घालून दिला आहे.
राजाराम मारुती कारखिले असे राळेगण थेरपाळच्या त्या शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांनी ड्रॅगन फ्रूट, सीताफळ, पपई यांची आंतरपीक पद्धतीने शेती फुलविली आहे.
राजाराम कारखिले म्हणाले, २०१५-१६ साली पुणे येथे भरलेल्या प्रदर्शनामध्ये ड्रॅगन फ्रूटची माहिती मिळविली. आपणही आपल्या शेतात नेहमीच पारंपरिक पिके घेतो. काही तरी वेगळे पीक घेतले पाहिजे असा विचार आला. त्यातूनच मनाशी निश्चय करत ड्रॅगन फ्रूटची शेती करण्याचा निर्णय घेतला. शेतीची मशागत करत प्रथम एकरामध्ये ३५० खांब उभे करून १६०० रोपे लागवड केली. संपूर्ण शेतीत ठिबक सिंचन केले. ज्यामुळे पाणीटंचाईच्या काळातही पाण्याची बचत होऊन पिकेही चांगले आले आहेत. उष्णतेपासून ड्रॅगन फ्रूटचे संरक्षण होण्यासाठी दोन झाडांच्यामध्ये एक सीताफळ तसेच पपईची लागवड केली. त्यामुळे इतर खर्चही वाचला. ड्रगेन फ्रूट लागवडीपासून ते फळधारणा होईपर्यंत एकरी अडीच लाख रूपये खर्च झाला. ड्रॅगन फ्रूटला शेणखत व सेंद्रीय खताचा वापर केला. पहिल्या वर्षी एकरी ७२ हजार रुपये उत्पन्न मिळाले. जसजसे फळ झाडांचे आयुर्मान वाढते तसे उत्पन्नही वाढते.
ड्रॅगन फ्रूट लागवड करण्यासाठी लोणी व्यंकनाथ (ता.श्रीगोंदा) येथील प्रगतिशील शेतकरी किसनराव छत्रे यांच्या शेतात प्रत्यक्ष पाहणी केली. त्यांचेही मार्गदर्शन लाभले. त्यामुळे यशस्वी होऊ शकलो. तसेच जवळे येथील वर्गमित्र नीलेश गणपत सालके यांचेही सहकार्य लाभले. पीक लागवडीपासूनच पत्नी रूपाली, मुलगा अभिजित, मुलगी आर्या, आई, वडील यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
----
दीड वर्षात उत्पन्न सुरू..
एकदा लागवड केल्यानंतर कमीत कमी तीस ते ३५ वर्षे यातून उत्पन्न मिळू शकते. त्यामुळे झालेला खर्च वजा जाऊन कमीत-कमी तीन लाखांपेक्षा जास्त उत्पन्न दरवर्षी यातून मिळते. लागवड केल्यानंतर १८ महिने ते दोन वर्षांत उत्पन्नाचा स्रोत सुरू होतो.
----
१८ राळेगण थेरपाळ
राळेगण थेरपाळ येथील शेतकरी राजाराम कारखिले यांच्या शेतातील ड्रॅगन फ्रूट.