डॉ. धोंगडे, साठे, वाघ, देऊळगावकर, पोतदार, उमप, डावखर, शेलार यांना डॉ. विठ्ठलराव विखे पाटील साहित्य पुरस्कार जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:25 IST2021-08-12T04:25:04+5:302021-08-12T04:25:04+5:30
पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील समाज प्रबोधन पुरस्कार लातूर येथील अतुल देऊळगावकर यांना, तर पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील ...

डॉ. धोंगडे, साठे, वाघ, देऊळगावकर, पोतदार, उमप, डावखर, शेलार यांना डॉ. विठ्ठलराव विखे पाटील साहित्य पुरस्कार जाहीर
पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील समाज प्रबोधन पुरस्कार लातूर येथील अतुल देऊळगावकर यांना, तर पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील नाट्यसेवा पुरस्कार पुणे येथील आशुतोष पोतदार यांना, आणि पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कलागौरव पुरस्कार मुंबई येथील नंदेश उमप यांना देण्यात येणार आहे. अहमदनगर जिल्हा उत्कृष्ट साहित्य पुरस्कार अर्चना डावखर (नेवासा) यांच्या ‘अधांतरीचे प्रश्न’ या कवितासंग्रहास, अहमदनगर जिल्हा विशेष साहित्य पुरस्कार सुधाकर शेलार (अहमदनगर) यांच्या ‘साहित्य संशोधन वाटा आणि वळणे’ या समीक्षा ग्रंथास देण्यात येणार असल्याचे पुरस्कार निवड समितीच्या वतीने जाहीर केले. कोविड संकटामुळे २०१९ च्या पुरस्कारांचे वितरण मागील वर्षी होऊ शकले नव्हते. पुरस्कार देण्याची हे ३० वर्ष आहे.
माजी मंत्री आमदार राधाकृष्ण विखे व पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष व ज्येष्ठ विचारवंत डॉ. रावसाहेब कसबे यांच्या उपस्थितीत रविवार (दि. २२ ऑगस्ट) रोजी प्रवरानगर येथे छोटेखानी समारंभात हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. हा कार्यक्रम ऑनलाईन पद्धतीने घेण्याचे नियोजन समितीच्यावतीने सुरू असल्याचे निवड समितीचे सदस्य-निमंत्रक डॉ. राजेंद्र सलालकर यांनी सांगितले.
डॉ. धोंगडे हे साहित्याचा मूलगामी शोध घेणारा समीक्षक व भाषेचे शैली मीमांसक म्हणून ओळखले जातात. ‘गार्डन ऑफ ईडन उर्फ साई सोसायटी’ ही मकरंद साठे यांची कादंबरी वेगळ्या आशयद्रव्याने भरलेली आहे. वाघ यांच्या ‘प्रतीत्यसमुत्पाद सिद्धांत’ या सैद्धांतिक ग्रंथात यांनी बौद्ध तत्त्वज्ञानाचे सविस्तर विवेचन केले आहे. डावखर यांचा ‘अधांतरीचे प्रश्न’ हा काव्यसंग्रह पुरुषी व्यवस्थेत होणारे मानसिक शोषण- दमन उजागर करणारा आहे. शेलार यांचा ‘साहित्य संशोधन वाटा आणि वळणे’ हा ग्रंथ नव संशोधकांना मार्गदर्शक ठरणारा आहे. ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ अतुल देऊळगावकर यांना यंदाचा समाजप्रबोधन पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. पोतदार हे नव्या पिढीतील एक महत्त्वाचे नाटककार, कवी, कथालेखक, भाषांतरकार, संपादक, आणि संशोधक आहेत. त्यांनी दरिओ फो, जॉ जाने यांची नाटके मराठीत अनुवादित केली. उमप हे आजच्या पिढीतील उमेदीचे लोककलाकार आहेत. त्यांनी शाहीर विठ्ठल उमप यांचा समृद्ध वारसा जोपासला आहे.
......................
-डॉ. रमेश धोंगडे यांना जीवनगौरव पुरस्कार
-मकरंद साठे यांना उत्कृष्ट साहित्य पुरस्कार
- नितीन वाघ यांना राज्यस्तरीय विशेष साहित्य पुरस्कार
- अतुल देऊळगावकर यांना समाज प्रबोधन पुरस्कार
- आशुतोष पोतदार यांना नाट्यसेवा पुरस्कार
-नंदेश उमप यांना कलागौरव पुरस्कार
- अर्चना डावखर यांना अहमदनगर जिल्हा उत्कृष्ट साहित्य पुरस्कार
- सुधाकर शेलार यांना अहमदनगर जिल्हा विशेष साहित्य पुरस्कार