घरात बसून करमेना, फिरायला जाऊ द्या, बायकोला आणू द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:15 IST2021-06-05T04:15:45+5:302021-06-05T04:15:45+5:30
अहमदनगर : घरात बसून कंटाळा आलाय. गोव्याला फिरायला जायचंय. जेवणाची सोय नाही. बायको माहेरी अडकली आहे, तिला आणायला जायचंय. ...

घरात बसून करमेना, फिरायला जाऊ द्या, बायकोला आणू द्या
अहमदनगर : घरात बसून कंटाळा आलाय. गोव्याला फिरायला जायचंय. जेवणाची सोय नाही. बायको माहेरी अडकली आहे, तिला आणायला जायचंय. अशा क्षुल्लक कारणांसाठीही सध्या अनेक जण पोलिसांकडे ई-पाससाठी ऑनलाईन अर्ज करत आहेत. गेल्या ४० दिवसांत तब्बल ६८ हजार जणांनी अर्ज करून पासची मागणी केली आहे. यातील अत्यावश्यक काम असलेल्या २० हजार जणांनाच पोलिसांनी पास देत उर्वरित अर्ज रद्द केले आहेत.
कोरोनाकाळात सर्वच ठिकाणची अनावश्यक गर्दी टाळण्यासाठी जिल्ह्यांतर्गत व जिल्ह्याच्या बाहेर जाण्यासाठी शासनाने ई-पासची सक्ती केली आहे. अत्यावश्यक काम असेल तर पोलिसांकडून प्रवासासाठी पास दिला जात आहे. पोलीस अधीक्षक कार्यालयातील सायबर सेलमधून ऑनलाईन अर्जाची पडताळणी करून हे ई-पास दिले जातात. २६ एप्रिल ३ जूनपर्यंत ई-पाससाठी तब्बल ६८ हजार जणांनी अर्ज केले आहेत. वैद्यकीय कारण, अंत्यविधी अथवा इतर अत्यावश्यक काम असणाऱ्यांचा पोलिसांनी तत्काळ पास मंजूर केला आहे. मात्र बहुतांशी जण क्षुल्लक कारणे टाकून केवळ अर्ज भरतात. अर्जासोबत आवश्यक असलेले कागदपत्रे जोडत नाहीत, असे अर्ज पडताळणी करून रद्द केले असल्याचे सायबर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक प्रतीक कोळी यांनी सांगितले.
----------------------------
नि:शुल्क ‘ई-पास’साठी काहींची एजंटगिरी
पोलीस प्रशासनाकडून नि:शुल्क दिला जाणारा ई-पास काढून देण्यासाठी जिल्ह्यात काही जणांनी एजंटगिरी सुरू केली असून, गरजू लोकांकडून हे एजंट एक पास काढून देण्यासाठी पाचशे ते हजार रुपये घेत असल्याची चर्चा आहे. ग्रामीण भागातील बहुतांशी जणांना पाससाठी ऑनलाईन अर्ज करता येत नाही. याचाच गैरफायदा काही जण घेऊन त्यांच्याकडून पैसे घेतात.
-----------------------------
कोरोनाकाळात गर्दी टळावी, यासाठी अत्यावश्यक कामांसाठीच ई-पास दिला जातो. नागरिकांनी ई-पाससाठी http://covid19.mhpolice.in या अधिकृत संकेतस्थळावर अर्ज करून आवश्यक ती कागदपत्रे जोडावीत. पोलिसांकडून पडताळणी करून तत्काळ पासला मंजुरी दिली जाते. या पाससाठी कुठलेही शुल्क लागत नाही. त्यामुळे नागरिकांनी कुणालाही पैसे देऊ नयेत, कुणी पैसे मागत असले तर जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क करावा.
- राजेंद्र भाेसले, प्रभारी निरीक्षक, सायबर पोलीस ठाणे