केडगावच्या पाण्यात वाटेकरी नको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 04:45 IST2020-12-17T04:45:32+5:302020-12-17T04:45:32+5:30
स्थायीचे सभापती मनोज कोतकर यांनी सभेतच ही मागणी फेटाळून लावली. याबाबत नगरसेवक विजय पठारे, संग्राम कोतकर, अमोल येवले यांनी ...

केडगावच्या पाण्यात वाटेकरी नको
स्थायीचे सभापती मनोज कोतकर यांनी सभेतच ही मागणी फेटाळून लावली. याबाबत नगरसेवक विजय पठारे, संग्राम कोतकर, अमोल येवले यांनी आयुक्तांची भेट घेऊन आपला विरोध दर्शविला. यात म्हटले आहे की, केडगाव हे नगर शहरातील मोठे उपनगर असून केडगावची लोकसंख्या १ लाखाच्या घरात पोहोचली आहे. दिवसेंदिवस केडगाव भागाचा विस्तार झपाट्याने वाढत आहे. सध्या केडगावला फेज १ पाणी पुरवठा योजना सुरू आहे. या योजनेचे काम सन २००८ पासून सुरू आहे. मात्र याला १२ वर्ष होत आले तरी अजूनही संपूर्ण केडगावात ही योजना कार्यान्वीत झालेली नाही. केडगावमधील बहुतांशी नव्या वसाहती या योजनांपासून वंचित आहेत. आम्ही शिवसेना नगरसेवकांनी अनेकदा लेखी मागणी व निवेदन देऊनही नव्या वसाहतींना केडगावच्या नव्या पाणी योजनेचे पाणी मिळाले नाही. जलवाहिनी अंथरणे व अंतर्गत वितरीत व्यवस्थेचे काम अर्धवट आहे. केडगावचे नागरिक गेली ३० वर्षे पाणीटंचाईशी सामना करीत आहेत. पाण्यासाठी आम्ही वणवण सहन केली. फेज १ मुळे केडगावला सध्या दोन -तीन दिवसांनी पाणी येते.
मनपाच्या स्थायी समितीच्या बैठकीत काही सन्माननीय सदस्यांनी केडगाव योजनेचे पाणी कल्याण रोडवरील उपनगरांना देण्याचा प्रस्ताव मांडला. मात्र केडगावकरांचीच तहाण पूर्ण भागत नाही अशा वेळी केडगाव योजनेचे पाणी उपनगराना दिले तर भविष्यात केडगावला पाणी टंचाईची भिषण समस्या निर्माण होईल. नगरमधील इतर उपनरांना फेज २ मधून पाणी द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.