बर्ड फ्लूला घाबरुन जावू नका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 04:21 IST2021-01-23T04:21:24+5:302021-01-23T04:21:24+5:30
: सध्या बर्ड फ्लूच्या प्रादुर्भावाची चर्चा सुरू आहे. बर्ड फ्लूला घाबरून जाऊ नका. जशी कोरोना काळात सॅनिटायझर, मास्क, हातमोजे ...

बर्ड फ्लूला घाबरुन जावू नका
: सध्या बर्ड फ्लूच्या प्रादुर्भावाची चर्चा सुरू आहे. बर्ड फ्लूला घाबरून जाऊ नका. जशी कोरोना काळात सॅनिटायझर, मास्क, हातमोजे याद्वारे काळजी घेतली, तशीच काळजी बर्ड फ्लूला रोखण्यात कोंबडी पाळणाऱ्यांनी घ्यावयाची आहे, अशी माहिती अहमदनगर जिल्ह्याचे पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. अजयनाथ थोरे यांनी दिली. कृषी विज्ञान केंद्र बाभळेश्वरद्वारे जिल्ह्यातील कोंबडी उत्पादकांसाठी आयोजित ऑनलाइन वेबिनारमध्ये बोलत होते.
केंद्रप्रमुख शास्त्रज्ञ डॉ. संभाजी नालकर, पशुधन शास्त्रज्ञ डॉ. विठ्ठल विखे, विस्तार विभाग शास्त्रज्ञ सुनील बोरुडे सहभागी झाले होते.
थोरे म्हणाले, एव्हीयन इन्फुलएंजा वर्गातील विषाणू आहे. याचे नाव एच ५ एन ८ आहे. याचा मानवाला कुठलाही धोका नाही. हा पक्षात पसरणारा रोग आहे. बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ज्यांच्याकडे कोंबड्या पाळल्या जातात, अशा ठिकाणी एक लिटर पाण्यात ७ ग्रॅम धुण्याचा सोडा घेऊन फवारणी करावी. याशिवाय २ टक्के सोडियम हायपोक्लोराईड किंवा ४ टक्के फाॅरमॅलिनचीदेखील फवारणी करू शकता. फवारणी करताना खुराडे, मोकळी जागा, गोठे, नाले या ठिकाणीसुद्धा फवारणी करावी. जिल्ह्यात काही ठिकाणी बर्ड फ्लूचे पॉझिटिव्ह नमुने सापडले आहेत. यासाठी पशूसंवर्धन विभागाने रॅपिड रिसपाॅन्स टिमचे पाच पथके तयार केेली आहेत. सर्व पथके जिल्ह्यातील परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. ज्यांच्याकडे पक्षी आहेत. त्यानी ५० मिलीपर्यंत लिव्होटॉनिक द्यावे. यामुळे प्रतिकारशक्ती वाढवून रोगांचा सामना पक्षी करू शकतील. सध्या वातावरणातील तापमानात चढ-उतार होत असल्यानेदेखील पक्ष्यांचे बळी पडण्याचे प्रमाण वाढत आहे.
आपल्याकडे मांसाहार करताना अन्न शिजवून घेतले जाते. ७० डिग्री सेल्सिअस तापमानात कुठलाच विषाणू / जीवाणू जगत नसतो. ग्रामीण भागातील गावरान पक्ष्यांच्या फार्ममध्ये लसीकरण केले जात नाही. यामुळे अशा उत्पादकांनी ताबडतोब प्रतिबंधात्मक उपचार सुरू करावेत. ग्रामीण भागातील पक्षात रानीखेत, मानमोडीसारखे आजार पूर्वीपासूनच आहेत.
कार्यक्रमात पशुविज्ञान विभागाचे डॉ. विठ्ठल विखे यांनी सुरुवातीस बर्ड फ्लूविषयी तांत्रिक माहिती दिली. केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. संभाजी नालकर यांनीही मार्गदर्शन केले. वेबिनारमध्ये पशुसंवर्धन विभागाचे पशुवैद्यक, शेतकरी सहभागी झाले होते.