डॉक्टर करतात झाडांचे आॅडिट!

By Admin | Updated: July 11, 2016 23:48 IST2016-07-11T23:40:28+5:302016-07-11T23:48:52+5:30

अहमदनगर : दर रविवारी डॉक्टरांनी एकत्र यायचे.... एखादी कॉलनी निवडायची... तेथे २० ते २५ झाडे लावायची... त्याच दिवशी पूर्वी लावलेल्या झाडांचे आॅडिट करायचे...

Doctors do audit trees! | डॉक्टर करतात झाडांचे आॅडिट!

डॉक्टर करतात झाडांचे आॅडिट!

अहमदनगर : दर रविवारी डॉक्टरांनी एकत्र यायचे.... एखादी कॉलनी निवडायची... तेथे २० ते २५ झाडे लावायची... त्याच दिवशी पूर्वी लावलेल्या झाडांचे आॅडिट करायचे... एखादे झाड जळाले तर तेथे पुन्हा नव्याने लावायचे.., असा वृक्ष संवर्धनाचा अविरत कार्यक्रम सुरू आहे. या उपक्रमासाठी शहरातील ८० डॉक्टरांनी एकत्र येत ‘प्लॅनेट ग्रुप’ स्थापन केला आहे.
समाजातील डॉक्टर हा घटक सर्वांत व्यस्त असतो! अनेकवेळा कुटुंबालाही वेळ देणे डॉक्टरांना शक्य नसते. रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा मानणारे डॉक्टर त्यांच्याच व्यवसायात २४ तास व्यस्त असतात. मात्र वृक्षारोपण कार्यक्रमातील वास्तव जाणणाऱ्या डॉक्टरांनी स्वत:चे चार तास पर्यावरण संवर्धनासाठी देण्याचा निर्धार केला. त्यातूनच दर रविवारी एकत्र येवून शहरात झाडे लावण्यासाठी डॉक्टर एकत्र येत आहेत. लोक झाडे लावतात, फोटो काढतात आणि पुन्हा झाड आले की नाही, याकडे दुर्लक्ष करतात. हीच खंत डॉक्टरांना होती म्हणून डॉक्टरांनीच झाडे लावण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी त्यांनी ‘प्लॅनेट ग्रुप’ची स्थापना केली. या ग्रुपमध्ये सध्या शहरातील ८० डॉक्टरांनी सहभाग घेतला आहे. दर रविवारी एक कॉलनी निवडायची आणि तेथे जावून २० ते २५ झाडे लावायची, असा त्यांचा कार्यक्रम निश्चित झाला. आतापर्यंत शहरातील ८ ते १० कॉलनीमध्ये झाडे लावली आहेत. लावलेले झाड आले की नाही, याची पाहणीही दर रविवारी केली जाते. झाडांचे हे आॅडिट अफलातून आहे. झाड वाळले किंवा जळाले असेल तर तेथे पुन्हा नव्याने झाड लावले जाते. वृक्षारोपण झाल्यानंतर लगेच ‘ट्री गार्ड’ बसविले जाते. त्यामुळे ती झाडे जनावरांनी खाण्याचा प्रश्नच येत नाही.
बालरोगतज्ज्ञ डॉ. श्याम व स्मिता तारडे यांनी प्लॅनेट ग्रुपसाठी पुढाकार घेतला. या ग्रुपमध्ये डॉ. अभिजित व रेणुका पाठक, धनंजय व सुमा वाघ, दर्शन व वैशाली गोरे, राजीव व मनीषा सूर्यवंशी, प्रताप पटारे, सचिन वहाडणे, पियुष खंडेलवाल यांच्यासह तब्बल ८० डॉक्टर सहभागी आहेत. गेल्या दोन महिन्यांपासून हा ग्रुप झाडे लावत आहे. आतापर्यंत ट्री गार्डसह २५० झाडे लावण्यात आली आहेत, असे डॉ. श्याम तारडे यांनी सांगितले.
(प्रतिनिधी)

Web Title: Doctors do audit trees!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.