वाढीव बिल आकारल्याचे डॉक्टरांनी केले मान्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:15 IST2021-07-02T04:15:16+5:302021-07-02T04:15:16+5:30
अहमदनगर: कोविड काळात रुग्णालयाचा खर्च वाढल्याचे कारण पुढे करीत वाढीव बिल घेतल्याच्या तक्रारींकडे डॉक्टरांनी कानाडोळा केला होता. परंतु, प्रशासनाच्या ...

वाढीव बिल आकारल्याचे डॉक्टरांनी केले मान्य
अहमदनगर: कोविड काळात रुग्णालयाचा खर्च वाढल्याचे कारण पुढे करीत वाढीव बिल घेतल्याच्या तक्रारींकडे डॉक्टरांनी कानाडोळा केला होता. परंतु, प्रशासनाच्या पाठपुराव्यामुळे शहरातील डॉक्टरही नरमले असून, त्यांना वाढीव बिले आकारल्याचे अखेर मान्य करावे लागले. वाढीव बिलाचे १८ लाख रुपयेही परत करण्याची तयारी डॉॅक्टरांनी दर्शविली असून, ही रक्कम आता रुग्णांना परत केली जाईल, अशी माहिती महापालिका आयुक्त शंकर गोरे यांनी दिली.
कोरोनाच्या संकट काळात जीव धोक्यात घालून डॉक्टरांनी आरोग्य सेवा पुरविली. सामाजिक दृष्टिकोनातून काही रुग्णालयांनी रुग्णांवर मोफत उपचार केले. काहींनी रुग्णांना बिलही माफ केले, अशी अनेक रुग्णालये आहेत. परंतु, शहरातील १७ नामवंत रुग्णालयांनी कोरोनाच्या पहिल्या लाटेत १ कोटी २० लाखांची वाढीव रक्कम रुग्णांकडून वसूल केल्याचे तपासणीतून समोर आले आहे. परंतु, कोविड काळात रुग्णालयाचा खर्चही वाढला होता. त्याआधारे बिले आकारण्यात आली असल्याचे डॉक्टरांनी सांगितले होते. तसेच वाढीव बिलाची रक्कम परत करण्याच्या प्रशासनाच्या निर्णयाविरोधात शहरातील एका रुग्णालयाने न्यायालयात धाव घेतली होती. त्याचा आधार घेत इतर रुग्णालयांनीही वाढीव रक्कम परत करण्यास सपशेल नकार दिला होता. परंतु, मनपा आयुक्तांनी याबाबत वेळोवेळी पाठपुरावा केला. त्यामुळे डॉक्टरही नरमले. इतर सर्व डॉक्टरांनी आपल्याकडील वाढीव रक्कम देण्याचे मान्य केले. वाढीव बिलाची रक्कम परत करण्यासाठी रुग्णालयांना ३० जून पर्यंतची मुदत देण्यात आली होती. दिलेल्या मुदतीत रुग्णालयांनी वाढीव बिलाची रक्कम रुग्णांना परत करून अहवाल महापालिकेला सादर करण्याचा आदेश रुग्णालयांना देण्यात आला आहे.
...
१८ लाख ८६ हजार रुपये परत मिळणार
कोविड रुग्णांकडून २४ लाख रुपयांची वाढीव बिले आकारली असल्याचे डॉक्टरांनीच मान्य केले असून, वाढीव बिलाचे १८ लाख रुग्णांना परत करण्यात आले आहेत. उर्वरित १८ लाख ७० हजारांची रक्कम रुग्णालयांनी रुग्णांना परत केली आहे. याशिवाय १८ लाख ८६ हजार रुपयेही आता डॉक्टरांनी परत करण्याचे मान्य केले असल्याचे आयुक्त गोरे यांनी सांगितले.
.....
सुरभिकडून ३३ लाखांची वसुली
शहरातील सुरभि हॉस्पिटलने कोविड रुग्णांकडून ३३ लाख ७५ हजारांची वाढीव रक्कम आकारली असल्याचे लेखा परीक्षणातून समोर आले आहे. याबाबत सुरभि रुग्णालयाला नोटीस बजावण्यात आली होती. त्याविरोधात सुरभि रुग्णालयाने न्यायालयात धाव घेतली होती. त्यावर सुनावणी होऊन दंडाची रक्कम वसूल करून कारवाईला स्थगिती दिल्याचे आयुक्त गोरे यांनी सांगितले.
....
तपासणी शुल्काबाबत तक्रारी
शहरातील एका रुग्णालयाने आकारलेल्या तपासणी शुल्काबाबत तक्रार प्राप्त झाली होती. लेखा परीक्षण करून १३८ रुग्णांना प्रत्येकी २०० रुपये परत करण्याचा आदेश संबंधित रुग्णालयास देण्यात आला आहे. रुग्णालयानेही ही रक्कम परत करण्याची तयारी दर्शविली आहे. मात्र रुग्ण हे पैसे घेण्यासाठी येत नसल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले.