दरोड्याचा तपास लागेना !
By Admin | Updated: June 7, 2014 00:18 IST2014-06-06T23:16:17+5:302014-06-07T00:18:37+5:30
कुळधरण : कर्जत तालुक्यातील कुळधरण येथे २२ मे रोजी रात्री सुपेकर यांच्या बंगल्यावर पडलेल्या दरोड्याचा तपास कासवगतीने चालू आहे.

दरोड्याचा तपास लागेना !
कुळधरण : कर्जत तालुक्यातील कुळधरण येथे २२ मे रोजी रात्री सुपेकर यांच्या बंगल्यावर पडलेल्या दरोड्याचा तपास कासवगतीने चालू आहे. चोरट्यांच्या दहशतीने भयभीत झालेल्या ग्रामस्थांना पोलीस तपासाची मोठी आशा आहे, मात्र तपासाला गती मिळत नसल्याने पोलीस सूत्रांनी सांगितल्याने ग्रामस्थांच्या भावना तीव्र आहेत.
दिशाहिन तपास आणि मोकाट फिरणारे हल्लेखोर यामुळे ग्रामस्थांनी ३१ मे रोजी पोलिसांविरुद्ध आंदोलन केले. कर्जत-श्रीगोंदा रस्ता दीड तास रोखत व गाव बंद ठेवत पोलिसांचा निषेध केला. संतप्त ग्रामस्थांसमोर पोलिसांनी एका महिलेला ताब्यात घेत कारवाईचा दिखावा केला. मात्र त्यातून पुढे काहीच सिद्ध झाले नाही. चौदा आंदोलकांवर गुन्हे दाखल करुन आंदोलन दाबण्याचा प्रयत्न झाला. एक जून रोजी तातडीची ग्रामसभा घेऊन पुन्हा पोलिसांचा निषेध करण्यात आला. सभेत चौदा आंदोलनकर्त्यांनी जामीन न घेण्याचा एकमताने निर्णय घेतला. माजी जि.प. सदस्य राजेंद्र गुंड, मंगेश पाटील यांनी मुस्कटदाबीला बळी न पडण्याचे आवाहन करीत निषेधाचा ठराव संमत केला. तसेच ७ जून रोजी पुन्हा रास्ता रोको व नऊ मे रोजी पोलीस ठाण्यासमोर उपोषण करण्याचा ठराव ग्रामसभेत झाला. तसेच आंदोलकांना रोखण्याचा प्रयत्न झाल्यास जेलभरो आंदोलन करण्याचा निर्णयही सभेत घेण्यात आला.
(वार्ताहर)
आंदोलनावर ठाम
दरोड्यातील हल्लेखोरांचा तपास न लावता आमच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले, असे माजी जि.प. सदस्य राजेंद्र गुंड, सेवा संस्थेचे संचालक मंगेश पाटील, शेतकरी संघटनेचे अशोक जगताप, उपसरपंच सतीश कळसकर, चंद्रकांत जगताप, मोहन सुपेकर यांनी ‘लोकमत’ शी बोलताना सांगितले. आंदोलनावर आम्ही ठाम असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
उपयुक्त माहिती नाही
कुळधरण दरोड्याचा तपास सुरू आहे. अटक केलेल्या दोघांकडृून उपयुक्त माहिती पुढे येत नाही. ताब्यात घेतलेल्या महिलेकडूनही काही माहिती मिळाली नाही. रास्ता रोकोचे निवेदन मला अद्याप मिळालेले नाही.
-नितीन चव्हाण
पोलीस निरीक्षक, कर्जत