औषधे, इंजेक्शन, व्हेंटिलेटरबाबत थेट रुग्णाशी चर्चा नको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:19 IST2021-05-17T04:19:10+5:302021-05-17T04:19:10+5:30
कोरोनामध्ये मनोबल खचल्याने अनेक रुग्ण गंभीर अवस्थेतून जात आहेत़ काहीजण तर यामुळे दगावत आहेत़ यामुळे तालुका प्रशासनाने ...

औषधे, इंजेक्शन, व्हेंटिलेटरबाबत थेट रुग्णाशी चर्चा नको
कोरोनामध्ये मनोबल खचल्याने अनेक रुग्ण गंभीर अवस्थेतून जात आहेत़ काहीजण तर यामुळे दगावत आहेत़ यामुळे तालुका प्रशासनाने शिक्षकांच्या प्रशिक्षित टीमकडून प्रत्येक रुग्णाला फोन करून दिलासा देण्याचे व त्यांच्या मनातील भीती घालवण्यासाठी प्रयत्न सुरू केलेले आहेत़ त्याचे चांगले परिणाम दिसत आहेत. कोरोनाचा उपचार घेत असलेल्या रुग्णांना अनेक डॉक्टर्स, नर्सेस ते गंभीर असल्याचे, त्यांना रेमडेसिविर, ऑक्सिजन बेड, व्हेंटिलेटरची आवश्यकता असल्याचे सांगत आहेत़ त्यामुळे रुग्ण पुरते खचून जात असल्याचे निदर्शनास आले आहे़ अनेकदा रुग्णासमोरच तो गंभीर असल्याची चर्चा करण्यात येत असते़ याचा परिणाम रुग्णाचे मनोबल तुटण्यात होऊ शकतो़
या पार्श्वभूमीवर डॉक्टर्स, नर्सेस अथवा वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी या सर्व बाबींसाठी रुग्णाच्या जवळच्या नातेवाईकाशी चर्चा करावी, त्यासाठी रुग्णाला दाखल करून घेताना जवळच्या नातेवाइकांचा मोबाईल नंबर घ्यावा, दाखल असलेल्या रुग्णाचे वारंवार समुपदेशन करून त्याला धीर द्यावा, त्यासाठी आवश्यकतेनुसार प्रशासनाने सुरू केलेल्या दिलासा उपक्रमाची मदत घ्यावी, अशा सूचना तहसीलदार कुंदन हिरे यांनी तालुक्यातील सर्व शासकीय व खासगी रुग्णालयांना दिल्या आहेत़ औषधे, इंजेक्शनची थेट मागणी केल्यास किंवा ऑक्सिजन, व्हेंटिलेटर बेडबाबत चर्चा करून त्याच्या मनात भीती निर्माण केल्यास कारवाई करण्याचा इशाराही हिरे यांनी दिला आहे़