भाविकांची वाहने अडवू नका
By Admin | Updated: May 22, 2016 00:17 IST2016-05-22T00:12:54+5:302016-05-22T00:17:41+5:30
शिर्डी : साईदर्शनाला आलेल्या भाविकांना महामार्ग पोलिसांच्या जाचातून सुटका होण्याची शक्यता निर्माण झाली आहे़

भाविकांची वाहने अडवू नका
शिर्डी : साईदर्शनाला आलेल्या भाविकांना महामार्ग पोलिसांच्या जाचातून सुटका होण्याची शक्यता निर्माण झाली आहे़ यापुढे भाविकांचीच नव्हे तर अन्य चारचाकी वाहनेही सूचना असल्याशिवाय अडवण्यात येऊ नये, अशा सक्त सूचना महामार्ग पोलीसचे मंडल निरीक्षक राजेंद्र मायने यांनी बाभळेश्वर पोलीस केंद्राला शनिवारी दिल्या़
टार्गेट पूर्ण करण्यासाठी भाविकाला त्रास होता कामा नये, अपघातात मदत करणे, प्रवाशांना मार्गदर्शन करणे अशी कामे करून पोलिसांची प्रतिमा उजाळण्याच्या सूचनाही मायने यांनी दिल्या आहेत़ त्यामुळे आता पोलीस निर्मळ पिंप्री किंवा अस्तगाव येथे वाहने अडवण्यासाठी थांबणार नाहीत, तसेच स्थानिकांसह कोणत्याही चारचाकी वाहनांवर विनाकारण कारवाया करणार नाहीत़ मोठी वाहने रस्त्याच्या खाली पार्कींग करण्याची सोय असणारा नवीन पॉईंट कारवाईसाठी निर्माण करण्यात येणार आहे़ एवढेच नव्हे तर नाशिककडून येणाऱ्या मार्गावर असलेल्या पोलिसांनाही अशाच प्रकारच्या सूचना दिल्या आहेत़
महामार्ग व अन्य पोलिसांकडून होणारा भाविकांना त्रास, पोलिसांच्या कार्यशैलीमुळे गेल्या आठवड्यातील अपघातासह वारंवार होणारे अपघात यावर ‘लोकमत’ ने गेले सहा दिवस सातत्याने लिखाण केले़ त्याची दखल राज्याच्या पोलीस महासंचालकांनीही घेतली़ तर भाविकांसाठी जीवघेण्या व पोलिसांची प्रतिमा मलीन करणाऱ्या या घटनांची पोलीस अधीक्षक डॉ़ सौरभ त्रिपाठी यांनी गंभीर दखल घेतली़ त्यांनी याबाबत झाडाझडतीही घेतली़