दिव्यांग ‘चाँद’ धावला.. जिंकण्या ‘फरिदा’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2021 04:20 IST2021-01-21T04:20:05+5:302021-01-21T04:20:05+5:30
बोधेगाव : केवळ दारू, पैसा अन् घराणेशाहीच्या जोरावर निवडणूक जिंकता येत नाही तर समाजोपयोगी कामातूनही निवडणूक जिंकता येते. हे ...

दिव्यांग ‘चाँद’ धावला.. जिंकण्या ‘फरिदा’
बोधेगाव : केवळ दारू, पैसा अन् घराणेशाहीच्या जोरावर निवडणूक जिंकता येत नाही तर समाजोपयोगी कामातूनही निवडणूक जिंकता येते. हे शेवगाव तालुक्यातील पिंगेवाडी ग्रामपंचायत निवडणुकीत एका सर्वसामान्य कुटुंबातील अवलिया दिव्यांग व्यक्तीने दिव्यांग पत्नीला निवडून आणून दाखवून दिले आहे. पिंगेवाडी येथील या अवलिया दिव्यांगाचे नाव चाँद कादर शेख (वय ३५) असे असून त्यांनी पत्नी फरिदा यांना ग्रामपंचायत निवडणुकीत जिंकून आणले.
चाँद शेख हे पायाने दिव्यांग असून अल्पभूधारक आहेत. त्यांचे मराठी विषयात एम.ए. झालेले आहे. तसेच ते सेट परीक्षा उत्तीर्ण असून पीएच.डीसाठी प्रयत्न करत आहेत. शासनाकडून दिव्यांगांसाठी राबविल्या जाणाऱ्या योजना दिव्यांग बांधवांपर्यंत पोहचविण्याचे काम चाँद शेख हे जवळपास ८ ते १० वर्षांपासून करत आहेत. याशिवाय दिव्यांगांना अंत्योदय योजनेचा लाभ, मोफत शिधापत्रिका, घरकूल योजना, दिव्यांग प्रमाणपत्र, घरपट्टी-पाणीपट्टी माफ होण्यासाठी प्रयत्न, विविध दाखले व प्रमाणपत्र काढून देणे आदी कामे ते विनामोबदला करतात. दिव्यांगांबरोबरच अनाथ, निरक्षर, वृद्ध, विधवा, शेतकरी आदींच्या मदतीसाठीही ते धावून येतात. तसेच आंदोलन, उपोषण व माहिती अधिकार या संविधानिक आयुधांचा वापर करून सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी ते सावली दिव्यांग संघटनेच्या माध्यमातून प्रयत्नशील असतात. या कर्तृत्वाच्या जोरावर त्यांनी कुठलेही पाठबळ नसताना गावातील ग्रामपंचायत निवडणूक लढवली. या निवडणुकीत वाॅर्ड क्र. ३ मधून त्यांची दिव्यांग पत्नी फरिदा चाँद शेख यांनी विजय मिळविला.
फोटो : २० फरिदा शेख, २० चांद शेख