बनावट नोटा वितरणाचे जिल्हाभर जाळे
By Admin | Updated: September 18, 2016 01:51 IST2016-09-18T01:48:49+5:302016-09-18T01:51:15+5:30
अहमदनगर : नगर शहरासह जिल्ह्यात गेल्या अनेक दिवसांपासून बनावट नोटांची तस्करी करून वितरण करणाऱ्या चौघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली

बनावट नोटा वितरणाचे जिल्हाभर जाळे
अहमदनगर : नगर शहरासह जिल्ह्यात गेल्या अनेक दिवसांपासून बनावट नोटांची तस्करी करून वितरण करणाऱ्या चौघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली असून, आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे़ पोलीस तपासात पाचव्या आरोपीचे नाव समोर आले असून, तोच या रॅकेटचा मास्टरमाइंड असल्याचे समजते़ पोलीस आता या आरोपीच्या शोधात आहेत़
पोलिसांना मिळालेल्या माहितीवरून शुक्रवारी सायंकाळी शहरातील पाईलाईन रोडवरील हॉटेल प्रियदर्शनी येथून संतोष बबन गवारे (वय ३३ रा़सोनई) याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे २ लाख ९ हजार रुपयांच्या बनावट नोटा आढळून आल्या़ यामध्ये १००० हजार ५०० रुपयांचे बंडल होते़ पोलिसांनी गवारे याच्याकडे चौकशी केली असता त्याने उर्वरित साथीदारांचीही नावे सांगितली़ पोलिसांनी नगर बसस्थानक व शेवगाव येथून विलास प्रभाकर प्रधान (वय २८ रा़ घोडेगाव) प्रवीण शशीकांत राऊत (वय २३ रा़ केडगाव) यांच्यासह शाहिद नावाच्या आरोपीस ताब्यात घेतले़ आरोपींवर तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ आरोपींना शनिवारी जिल्हा न्यायालयात हजर केले असता त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली़
(प्रतिनिधी)
लाखो रुपयांच्या बनावट नोटा चलनात
जिल्ह्यात बनावट नोटा आणून त्या बाजारात चलनात आणणारी टोळीच सक्रिय असल्याचे समोर आले आहे़ या रॅकेटमध्ये आणखी किती आरोपी आहेत़ या नोटा कुठे तयार केल्या जातात तसेच जिल्ह्यात त्यांचे कुठे वितरण होते याचा पोलीस शोध घेत आहेत़ प्रत्येक तालुक्यात एक ते दोन जण या रॅकेटमध्ये काम करत असल्याचे समजते़ या रॅकेटच्या माध्यमातून लाखो रुपयांच्या बनावट नोटा चलनात आल्या आहे़ बनावट नोटांमुळे व्यवहार करताना अनेकांना फटका बसत आहे़
नोटांची निर्मिती अत्याधुनिक प्रिटिंगमध्ये
४पोलिसांनी आरोपींकडून हस्तगत केलेल्या नोटा या स्थानिक ठिकाणी बनविलेल्या नसून बाहेर अत्याधुनिक प्रिंटिंग मशीनमध्ये तयार केलेल्या आहेत़ बनावट असलेली ही नोट खोटी असल्याचे सहजासहजी लक्षात येत नाही़ त्यामुळे खरी म्हणून या नोटा मोठ्या प्रमाणात चलनात आलेल्या आहेत़