जिल्हानियोजन समिती निवडणुकीचा निकाल जाहीर; काँग्रेस-राष्ट्रवादीचा प्रत्येकी 11 जागांवर विजय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2017 16:05 IST2017-08-23T16:04:40+5:302017-08-23T16:05:04+5:30
जिल्हा नियोजन समितीची मंगळवारी निवडणुक पार पडली होती. या निवडणुकीचा बुधवारी निकाल जाहीर झाला.

जिल्हानियोजन समिती निवडणुकीचा निकाल जाहीर; काँग्रेस-राष्ट्रवादीचा प्रत्येकी 11 जागांवर विजय
अहमदनगर, दि. 23- जिल्हा नियोजन समितीची मंगळवारी निवडणुक पार पडली होती. या निवडणुकीचा बुधवारी निकाल जाहीर झाला. मुख्य निवडणूक अधिकारी तथा अप्पर जिल्हाधिकारी भानुदास पालवे यांच्या मुख्य उपस्थितीत सैनिक लॉन येथे मतमोजणी झाली. या मतमोजणी प्रक्रियेद्वारे जिल्हा नियोजन समितीसाठी 36 जागांच्या निवडणुकीत भाजपचे ९ काँग्रेसचे ११. राष्ट्रवादी ११, क्रांतिकारी पक्षाचे २, शिवसेना १ तर जनशक्ती १ आणि महाआघाडीचा १ असे उमेदवार विजयी झाले. या निवडणुकीमध्ये भाजपने मुसंडी मारीत मोठ्या संख्येने विजय मिळवल्याचं निदर्शनास आलं आहे.
जिल्हा परिषद महिला सर्वसाधारण प्रवर्गातील ९ जागांसाठी १० उमेदवार होते. राजश्री घुले (राष्ट्रवादी काँग्रेस), आशा दिघे (काँग्रेस), अनुराधा नागवडे (काँग्रेस) रोहिणी निघुते (काँग्रेस), सुप्रिया पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस), सुनिता भांगरे (भाजप) राणी लंके (शिवसेना) दिपाली गिरमकर (भाजपा) आणि विमल आगवण (राष्ट्रवादी काँग्रेस) अशी विजयी उमेदवारांची नावं आहेत.
जिल्हा परिषद सर्वसाधारण गटासाठी एकूण आठ जागा निर्धारित होत्या. विजयी उमेदवारांत राजेश परजणे (काँग्रेस), जालिंदर वाकचौरे (भाजपा) प्रभावती ढाकणे (राष्ट्रवादी काँग्रेस) आणि हर्षदा काकडे व सुधाकर दंडवते (जनशक्ती) यांचा समावेश आहे. तर सर्वसाधारण जिल्हा परिषदेतील गटातील पराभूत उमेदवार पुष्पा वराळ, शरद झोडगे (शिवसेना) व गुलाबराव तनपुरे यांचा समावेश आहे. जिल्हा परिषद नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी ५ जागेसाठी ६ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. विजयी उमेदवारांत रामहरी कातोरे, सुनील गडाख, शिवाजी गाडे, दत्तात्रय काळे व प्रताप शेळके यांचा समावेश आहे. तर पराभूत उमेदवारात शिवसेनेचे नेते अनिल कराळे यांचा समावेश आहे. नगरपंचायत मतदार संघातील खुल्या गटात १ महिलेसाठी आरक्षित असणाऱ्या जागेवर सोनाली नायकवडी या विजयी झाल्या आहेत. नगरपालिका सर्वसाधारण महिला गटासाठी आरक्षित असणाऱ्या जागेवर डॉक्टर उषाबाई तनपुरे (राष्ट्रवादी काँग्रेस) यांचा विजय झाला. तर नगरपालिका अनुसूचित जातीसाठी आरक्षित जागेवर संतोष कांबळे हे महाआघाडीचे उमेदवार विजयी झाले असून त्यांनी चंद्रकला डोळस यांचा पराभव केला. नगरपालिकेतील नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला या जागेसाठी स्नेहल खोरे महाआघाडीच्या उमेदवार विजयी झाल्या असून त्यांनी मंगला गाडेकर यांचा पराभव केला.