शेवगाव तालुक्यात दुसऱ्या टप्प्यातील अतिवृष्टीचे अनुदान वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 04:20 IST2021-03-06T04:20:59+5:302021-03-06T04:20:59+5:30
शेवगाव : तालुक्यातील अतिवृष्टीमुळे होरपळलेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर महसूल विभागाने दुसऱ्या टप्प्यातील अनुदान वर्ग केले असून, पुढील आठवड्यात अनुदानाची ...

शेवगाव तालुक्यात दुसऱ्या टप्प्यातील अतिवृष्टीचे अनुदान वाटप
शेवगाव : तालुक्यातील अतिवृष्टीमुळे होरपळलेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर महसूल विभागाने दुसऱ्या टप्प्यातील अनुदान वर्ग केले असून, पुढील आठवड्यात अनुदानाची रक्कम काढता येणार आहे, अशी माहिती तहसीलदार अर्चना पागिरे यांनी दिली आहे.
मागील वर्षी झालेल्या अतिवृष्टी व मुसळधार पावसामुळे खरीप व रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते.
यावेळी प्रशासनाने तत्काळ नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करून शासनाकडे नुकसानाबाबतचा अहवाल पाठवला होता. त्यानुसार शासनाने शेतकऱ्यांना मदत देऊ केली. पहिल्या टप्प्यात ५५ गावांना अनुदानाची रक्कम वाटप करण्यात आली.
तालुक्यात ४१ हजार हेक्टर क्षेत्रातील पिकं बाधित झाले होते, त्यासाठी एकूण ४२ कोटी ४६ लाख अनुदान प्राप्त झाले. सदर अनुदानाची रक्कम १११ गावातील ५४ हजार ५४८ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आली.
अद्याप दोन गावे बाकी असून, तेथे १ कोटी १० लाख अनुदान लवकरच देण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात २४ कोटी २३ लाख अनुदान प्राप्त झाले होते ते ५५ गावातील २३ हजार ८०२ हेक्टर क्षेत्र बाधित झाल्याने ३० हजार ७८६ शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर २३ कोटी ७१ लाख रुपये पूर्वीच वर्ग करण्यात आले आहे.
गत महिन्यात दुसऱ्या टप्प्यातील २४ कोटी २३ लाख रुपये अनुदान प्राप्त झाले होते. हे अनुदान ५६ गावातील २३ हजार ७६२ शेतकऱ्यांना १७ हजार २०५ बाधित हेक्टर क्षेत्रासाठी १९ कोटी ६५ लाख रुपयांचे धनादेश बँकेकडे सुपुर्द केले असून, लवकरच ते शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा होणार आहेत. २०२० मध्ये तालुक्याच्या काही भागात अवकाळी पावसाने नुकसान झाले. अशा १५ गावच्या मदतीसाठी ३३ लाख रुपये मदत प्राप्त झाली आहे. ही मदत वितरीत करण्यासाठी याद्या तयार करण्याचे काम सुरू आहे.