सावेडीच्या महावितरण कार्यालयात तोडफोड
By Admin | Updated: April 20, 2016 00:09 IST2016-04-20T00:04:56+5:302016-04-20T00:09:29+5:30
अहमदनगर : सावेडी परिसरात वीज बंद झाल्याचा राग आल्याने अज्ञात इसमांनी सोमवारी मध्यरात्री सावेडी येथील महावितरण कंपनीच्या कक्ष कार्यालयाची तोडफोड केली.

सावेडीच्या महावितरण कार्यालयात तोडफोड
अहमदनगर : सावेडी परिसरात वीज बंद झाल्याचा राग आल्याने अज्ञात इसमांनी सोमवारी मध्यरात्री सावेडी येथील महावितरण कंपनीच्या कक्ष कार्यालयाची तोडफोड केली. या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात अज्ञात इसमांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी महावितरण कंपनीचे सहायक अभियंता भरत तात्याबा पवार यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात सोमवारी फिर्याद दाखल केली. यात म्हटले आहे, रविवारी दिवसभराचे कामकाज आटोपल्यानंतर चार वायरमनची रात्रपाळीसाठी नियुक्ती केली. त्यानंतर रात्री एकच्या सुमारास सिव्हिल वाहिनीत बिघाड झाल्याने सावेडी परिसरातील वीज बंद झाली. ही दुरुस्ती करण्यासाठी सर्व वायरमन एमआयडीसी येथील वीज उपकेंद्रावर रवाना झाले. यावेळी कक्ष कार्यालय बंद करण्यात आले होते. वीज सुरू करण्यासाठी रात्री उशिरापर्यंत दुरुस्तीचे काम सुरू होते. दरम्यानच्या काळात अज्ञात इसमांनी कक्ष कार्यालयाचा दरवाजा तोडला. कार्यालयातील टेलिफोन, खुर्च्या, फर्निचर अशा साहित्याची मोडतोड केली. या प्रकरणी पोलिसांनी सोमवारी दुपारी अज्ञात इसमांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
(प्रतिनिधी)