प्रसूत महिलेची अवहेलना
By Admin | Updated: July 22, 2014 00:06 IST2014-07-21T23:13:00+5:302014-07-22T00:06:15+5:30
राहुरी : तासाभराची प्रतीक्षा करूनही वैद्यकीय उपचार न मिळाल्याने दुसऱ्या दवाखान्यात जाताना महिलेची वाहनातच प्रसुती झाली.

प्रसूत महिलेची अवहेलना
राहुरी : तासाभराची प्रतीक्षा करूनही वैद्यकीय उपचार न मिळाल्याने दुसऱ्या दवाखान्यात जाताना महिलेची वाहनातच प्रसुती झाली. त्यानंतर ग्रामीण रूग्णालयात दाखल करून घेण्यास कर्मचाऱ्यांनी नकार दिला. त्यामुळे या महिलेची प्रसुतीआधी व नंतरही अवहेलना झाली.
प्रसुतीच्या वेदना सुरू झाल्यानंतर बाभूळगाव येथील महिलेला एका मालवाहतूक गाडीने तातडीने राहुरी येथे आणण्यात आले़ मात्र तासाभराची प्रतीक्षा करूनही राहुरी शहरात वैद्यकीय उपचार न मिळाल्याने तिच्या आई-वडिलांनी दुसऱ्या दवाखान्यात नेण्याचे ठरवले. या धावपळीत रात्रीचे नऊ वाजले. दुसऱ्या हॉस्पिटलमध्येही डॉक्टर नसल्याने तिचा पुन्हा प्रवास सुरू झाला. यादरम्यानच तिला प्रचंड त्रास होत असल्याने आई-वडिलांनी नाईलाजास्तव मुलीचे बाळंतपण गाडीतच करण्याचा निर्णय घेतला़
कोणत्याही डॉक्टराविना त्या महिलेची सुखरूप प्रसुती झाली व तिने एका गोंडस बाळाला जन्म दिला. त्यामुळे सर्वांचा जीव भांड्यात पडला. परंतु संकट अजून टळले नव्हते. बाळाची नाळ कशी कापावी? असा प्रश्न निर्माण झाला़ कोणीतरी सरकारी दवाखान्यात जाण्याचा सल्ला दिला़ तसे आई-वडिलांनी धावपळ करीत राहुरीचे ग्रामीण रूग्णालय गाठले. परंतुतिथेही वैद्यकीय अधिकारी उपस्थित नव्हते़ तेथील दोन परिचारिकांनी महिलेला दाखल करून घेण्यास नकार दिला़ तुमच्याकडे रिपोर्ट नाही तर दाखल कसे करून घ्यायचे, असे म्हणत त्यांनी त्यांची हतबलता दर्शवली. नंतर एका युवकाने याबद्दल तक्रार करण्याचा इशारा देताच या महिलेला रूग्णालयात दाखल करून घेण्यात आले.
रात्रभर रूग्णालयात मुक्काम केल्यानंतर दुसऱ्या दिवशी महिला बाळासह सुखरूप बाभूळगावला गेली़ परंतु दोन दिवसांत तिची झालेली अवहेलना आयुष्यभर विसरणार नाही, अशी प्रतिक्रिया तिच्या आई-वडिलांनी दिली. (तालुका प्रतिनिधी)