दिघोळला ४ दिवसांत ५३ कोरोनाबाधित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:20 IST2021-03-21T04:20:49+5:302021-03-21T04:20:49+5:30
जामखेड : तालुक्यातील दिघोळ येथे मागील चार दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्ण वाढले आहेत. शनिवार रात्रीपर्यंत ५३ कोरोनाबाधित रूग्ण आढळून आल्याने ...

दिघोळला ४ दिवसांत ५३ कोरोनाबाधित
जामखेड : तालुक्यातील दिघोळ येथे मागील चार दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्ण वाढले आहेत. शनिवार रात्रीपर्यंत ५३ कोरोनाबाधित रूग्ण आढळून आल्याने तहसीलदार विशाल नाईकवाडे यांनी गावात अत्यावश्यक सेवा वगळता पंधरा दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला आहे.
दिघोळ येथील जिल्हा परिषद शाळेत काेरोना चाचणी केली जात आहे. प्रत्येक घरातील सर्वांनी कोरोना चाचणी करून घेण्याचे आवाहन प्रशासनाने ध्वनिक्षेपकावरून केले आहे. बाधितांमध्ये ग्रामपंचायत पदाधिकारी, सदस्यांचाही समावेश आहे. येथील सर्वजण आरोळे हॉस्पिटल येथील कोविड सेंटरमध्ये उपचार घेत आहेत.
दिघोळ येथे बुधवारपासून कोरोनाबाधित रुग्ण आढळू लागले आहेत. दररोज रुग्ण संख्या वाढत आहे. शनिवारी येथे १८ कोरोनाबाधित आढळले. एकूण रुग्ण संख्या ५३ झाली. शनिवारी तहसीलदार विशाल नाईकवाडे यांनी गटविकास अधिकारी परशुराम कोकणी व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुनील बोराडे, महसूल कर्मचारी यांना बरोबर घेऊन दिघोळला भेट दिली. नागरिकांच्या घरोघरी जात व ध्वनिक्षेपकावरून कोरोना चाचणी करण्याचे आवाहन केले. अत्यावश्यक सेवा वगळता १५ दिवसांचे लाॅकडाऊन दोनच दिवसांपूर्वीच नाईकवाडे यांनी जाहीर केले. प्रशासनाने गाव निर्जंतुक केले आहे. कोरोनाची वाढती पार्श्वभूमी पाहता नागरिकांनी शासनाने दिलेले नियम पाळण्याचे आवाहन केले आहे.