घनशाम शेलारांचा राष्ट्रवादीकडे अर्ज
By Admin | Updated: August 20, 2014 23:31 IST2014-08-20T23:26:44+5:302014-08-20T23:31:04+5:30
अहमदनगर: माजी मंत्री आमदार बबनराव पाचपुते यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देताच पक्षाला रामराम ठोकणारे घनशाम शेलार यांनी पक्षाकडे श्रीगोंदा मतदारसंघातून उमेदवारी मागितली आहे.

घनशाम शेलारांचा राष्ट्रवादीकडे अर्ज
अहमदनगर: माजी मंत्री आमदार बबनराव पाचपुते यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देताच पक्षाला रामराम ठोकणारे घनशाम शेलार यांनी पक्षाकडे श्रीगोंदा मतदारसंघातून उमेदवारी मागितली आहे. १२ मतदारसंघातील ६२ इच्छुकांनी पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे. इच्छुकांच्या मुलाखती पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्यासमोर दि. २७ रोजी मुंबईत होणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष पांडुरंग अभंग यांनी दिली.
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक असणाऱ्यांचे अर्ज पक्षाने २० तारखेपर्यंत जिल्हा कमिटीकडे मागविले होते. अर्ज दाखल करण्याचा बुधवारी शेवटचा दिवस होता. ६१ इच्छुकांनी पक्षाच्या जिल्हा कार्यालयात तर नगरचे महापौर संग्राम जगताप यांनी थेट प्रदेश समितीकडे आपला अर्ज दाखल केला आहे. श्रीगोंद्याचे आमदार बबनराव पाचपुते यांनी गत आठवड्यातच राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिली. त्यापूर्वी पक्षाचे जिल्हाध्यक्ष असताना घनशाम शेलार यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकला होता. पाचपुते पक्षातून जाताच शेलार पुन्हा पक्षाच्या संपर्कात होते. बुधवारी तर त्यांनी श्रीगोंदा मतदारसंघातून उमेदवारी मिळावी म्हणून अर्जही भरला. कॉँग्रेस पक्षाच्या चिन्हावर जिल्हा परिषदेच्या बेलवंडी गटातून विजयी झालेले अण्णासाहेब शेलार यांनीही राष्ट्रवादीकडून उमेदवारीची इच्छा व्यक्त केली आहे. तसा उमेदवारी अर्ज त्यांनी बुधवारी पक्षाकडे भरला. शेलारांसह केशव बेरड, राजश्री पवार यांनीही श्रीगोंदा मतदारसंघातून राष्ट्रवादीकडून अर्ज दाखल केले आहेत. (प्रतिनिधी)