लॉकडाऊनमुळे शनिवार, रविवारी दस्त नोंदणी बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:22 IST2021-04-09T04:22:16+5:302021-04-09T04:22:16+5:30
अहमदनगर : कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे दस्त नोंदणीसाठी दुय्यम निबंधक कार्यालयात नागरिकांनी गर्दी करू नये. ज्यांनी ऑनलाईन पूर्व नोंदणी केली ...

लॉकडाऊनमुळे शनिवार, रविवारी दस्त नोंदणी बंद
अहमदनगर : कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे दस्त नोंदणीसाठी दुय्यम निबंधक कार्यालयात नागरिकांनी गर्दी करू नये. ज्यांनी ऑनलाईन पूर्व नोंदणी केली असेल त्यांनीच दस्त नोंदणीसाठी यावे, असे आवाहन मुद्रांक जिल्हाधिकारी राजेंद्र पाटील यांनी केले आहे. दरम्यान लॉकडाऊनमुळे शनिवार, रविवारी दस्त नोंदणी पूर्ण बंद राहणार आहे.
लॉकडाऊनमुळे शनिवार, रविवारी दस्त नोंदणी कार्यालये बंद ठेवण्याचा निर्णय राज्याच्या नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने घेतला आहे. त्या अनुषंगाने अहमदनगर जिल्ह्यातील सर्व दुय्यम निबंधक कार्यालयात गर्दी करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. सर्व दस्त नोंदणी कार्यालये सोमवार ते शुक्रवार सकाळी ९.४५ ते सायंकाळी ६.१५ या वेळेत सुरू राहणार आहेत. दस्त नोंदणी कार्यालयांमध्ये प्रत्यक्ष येऊन भाडेकरार नोंदविण्यास स्थगिती देण्यात आली आहे. वेब कॉमेर, थम्ब इम्प्रेशन हे साहित्य असल्यास नागरिक घरबसल्या भाडेकरार नोंदवू शकतात. भाडेकरार नोंदवून घेण्यासाठी पर्याय आहे. संबंधित व्यक्ती या नागरिकांच्या घरी जाऊन भाडेकरार नोंदवू शकतात, अशी सोय असल्याने नागरिकांनी दुय्यम निबंधक कार्यालयात येऊ नये.
-------
असे राहील कामकाज
शनिवार, रविवारी कार्यालय बंद
दस्त नोंदणीची सोमवार ते शुक्रवार वेळ- सकाळी ९.४५ ते सायंकाळी ६.१५
भाडेकरार ऑनलाईन होणार
दस्त नोंदणीसाठी येणाऱ्या नागरिकांनी स्वत:चे पेन आणावेत
मास्क न लावल्यास कार्यालयात प्रवेश नाही
आधी ऑनलाईन नोंदणी केल्यासच दस्त नोंदणी होईल
----------------
ऑनलाईन सुविधांवर राहणार भर
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने दस्त नोंदणीसाठी ऑनलाईन सुविधांचा अधिकाधिक वापर करावा. विभागाच्या संकेतस्थळावर दस्त नोंदणीसाठी पब्लिक डेटा एंट्रीद्वारे (पीडीई) डेटा एन्ट्री किंवा दुरुस्ती थांबविण्यात आली आहे. पीडीई डेटा एन्ट्री करून दस्त नोंदणीसाठी विभागाच्या वेबसाईटवर ‘ई- स्टेप इन’ या प्रणालीद्वारे दस्त नोंदणी कार्यालयातील उपलब्ध असलेली सोयीची वेळ आरक्षित करावी किंवा कार्यालयातील दूरध्वनीवर संपर्क साधून वेळ आरक्षित करावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. आगाऊ वेळ आरक्षित केली नसल्यास दस्त नोंदणी होणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.