नवरदेवाला घेऊन घोड्याने ठोकली धूम
By Admin | Updated: April 23, 2017 17:41 IST2017-04-23T17:41:17+5:302017-04-23T17:41:17+5:30
लग्नाच्या वरातीतून नवरदेवाला घेऊन घोड्याने धूम ठोकली. मात्र घटनास्थळापासून एक किलोमीटर अंतरावर नवरदेव घोड्यावरुन खाली पडून जखमी झाला.

नवरदेवाला घेऊन घोड्याने ठोकली धूम
आॅनलाइन लोकमत
श्रीगोंदा (अहमदनगर), दि़ 23 - लग्नाच्या वरातीतून नवरदेवाला घेऊन घोड्याने धूम ठोकली. मात्र घटनास्थळापासून एक किलोमीटर अंतरावर नवरदेव घोड्यावरुन खाली पडून जखमी झाला. बोहल्यावर चढण्यापूर्वीच दवाखान्यात उपचार करण्याची वेळ नवरदेवावर आली. रविवारी सकाळी अकराच्या सुमारास श्रीगोंदा तालुक्यातील घारगाव येथे ही घटना घडली.
चांडगाव येथील रामदास म्हस्के यांचे चिरंजीव सचिन व रुई छत्तीशी येथील प्रमोद भवर यांची कन्या सुप्रिया यांचा विवाह रविवारी होता. लग्नापूर्वी नवरदेवाची सकाळी अकराच्या सुमारास सवाद्य घोड्यावरुन मिरवणूक काढण्यात आली. नवरदेवाचे मित्र डिजेच्या तालावर बेभान होऊन नाचत होते. डिजेच्या तालावर घोडा नृत्य करीत असताना अचानक तो बिथरला. घोडा नाचविणाराकडून लगाम सुटल्याने घोड्याने नवरदेवासह वरातीमधून धूम ठोकली.
साधारण एक कि.मी. अंतरावर नवरदेवाला घोड्याने दूर नेले. ग्रामस्थ व नातेवाईक घोड्याच्या मागे धावले. त्यावेळी नवरदेव घोड्यावरुन पडून जखमी झाल्याचे दिसले. नातेवाईकांनी त्याला दवाखान्यात नेऊन उपचार केले. तोपर्यंत नवरदेवाच्या मित्रांनी घोड्याची धुलाई केली. त्यानंतर सुमारे तासाभराने उशिरा सचिन व सुप्रिया विवाहबध्द झाले.