साईभक्तांची श्रद्धा अढळ
By Admin | Updated: July 7, 2014 00:36 IST2014-07-06T23:47:29+5:302014-07-07T00:36:47+5:30
शिर्डी: द्वारकापीठाच्या शंकराचार्यांनी साईबाबांच्या देवत्वाला आव्हान दिले असले तरी साईभक्तांचा विश्वास यत्किंचितही कमी झालेला नाही़
साईभक्तांची श्रद्धा अढळ
शिर्डी: द्वारकापीठाच्या शंकराचार्यांनी साईबाबांच्या देवत्वाला आव्हान दिले असले तरी साईभक्तांचा विश्वास यत्किंचितही कमी झालेला नाही़ गेल्या दहा दिवसांत साईदरबारी हजेरी लावणाऱ्या भाविकांच्या संख्येत व दानपेटीत पडणाऱ्या देगणीतही आश्चर्यकारकरीत्या वाढ झाली आहे.
गेल्या दहा दिवसांत मागील वर्षीच्या तुलनेत रोजच्या देणगीत सरासरी सोळा लाखांची वाढ झाली आहे़ याशिवाय प्रसादालयातील भाविकांच्या संख्येतही वाढ झाल्याने भाविकांनी आपल्या कृतीतून साईबाबांवरील श्रद्धा अढळ असल्याचा पुरावा दिला आहे़
गेल्या २३ जून रोजी शंकराचार्यांनी बाबांच्या देवत्वावर, साईदरबारी जमा होणाऱ्या निधीच्या विनियोगावर शंका उपस्थित केल्या होत्या़ त्यानंतर दुष्काळ असतानाही भाविकांनी शिर्डीत मोठ्या संख्येने हजेरी लावून व दान करून साईदरबार बंद पाडण्याची वल्गना करणाऱ्या शंकराचार्यांना चोख प्रत्युत्तर दिले़
गेल्या वर्षी २३ जून २०१३ ते ३ जुलै २०१३ या दहा दिवसांच्या कालावधीत भाविकांनी दानपेटीत सात ७ कोटी ४५ लाखांची देणगी टाकली होती़ यंदा याच काळात ९ कोटी ७ लाखांचे भरभरून दान साईचरणी अर्पण केले आहे़ मागील वर्षीच्या तुलनेत ही वाढ १ कोटी ६१ लाख रूपये आहे़ मागील वर्षी या काळात ४ लाख ३० हजार भाविकांनी संस्थानच्या प्रसादालयात भोजन घेतले तर यंदा ४ लाख ३२ हजारांनी या भोजनाचा लाभ घेतला़ यावरून भाविकांच्या संख्येत वाढ झाल्याचे स्पष्ट होत आहे़ (तालुका प्रतिनिधी)
रूग्णसेवेचा यज्ञ सुरू
सार्इंना अर्पण करण्यात आलेल्या देणगीतून अन्नदान, ज्ञानदान व रूग्णसेवेचा अखंड यज्ञ सुरू आहे़ गेल्या वर्षी संस्थानच्या दोन्ही रूग्णालयात तब्बल साडेचार लाख रूग्णांनी सेवेचा लाभ घेतला़ हृदय शस्त्रक्रियेत हे रूग्णालय राज्यात अग्रणी आहे़ तर संस्थानच्या प्रसादालयात जवळपास एक कोटी चाळीस लाख भाविकांनी प्रसाद भोजन घेतले़ संस्थानच्या शैक्षणिक संकुलातही पाच हजार विद्यार्थी ज्ञानार्जन करीत आहेत़